ठाणे : रमजान ईदपर्यंत (३ मे) भोंगे उतरवले नाहीत तर राज्यात जिथे भोंगे दिसतील तिथे हनुमान चालिसा लावणारच, असा ठाम निर्धार राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत व्यक्त केला.
लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचे काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच! वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना याचा त्रास होतो. एक तर सगळे बेसूर असतात. रस्त्यावर घाण झाली, फुटपाथवर घाण झाली तर ते आपण साफ करतो. मग कानांना त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला सांगतो, यातून मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी बंदी आहे, तिथे निमूटपणे ऐकता ना? माझ्या परिचयाची मुस्लीम लोकं येऊन सांगतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो इतर धर्मीयांना त्रास देतो? आज रमजान चालू आहे, आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो. नवरात्रौत्सव असतो. १० दिवसांत आपण समजू शकतो, तरीही तो लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, तो भाग वेगळा. सणवार असेल तर आपण समजू शकतो. पण ३६५ दिवस तुम्ही या लाऊडस्पीकरमधून गोष्टी ऐकवता, कशासाठी? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाही. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. आज १२ तारीख आहे. १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी असेल, तर राज्याच्या गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे मतांसाठी होत नाही का? मग आम्ही हे उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे की देशात जिथे कुठे बांग सुरू असेल, तिथे हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. आम्हाला काय त्रास होतो, तो एकदा त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचाही खरपूस समाचार घेतला. यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. राज ठाकरेंनी यावेळी मुंब्र्यातून अटक अतिरेक्यांची यादीच वाचून दाखवली.
२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकांना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्च २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतला आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक…. आता तुम्ही म्हणाल, वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार. मी कुठे म्हटलो होतो की अतिरेकी सापडणार नाहीत. या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय.
सलीम मामा शेख याच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक राहतात. पण सलीम निवडून येतो. याचं कारण हे मराठी मुसलमान. देशावर प्रेम करणारे, प्रामाणिक राहणारे मुसलमान. देशात धर्माचा अतिरेक करणारे जे लोक आहेत, त्यांच्यामुळे हे मुसलमान भरडले जात आहेत.
शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. बरं शरद पवारांनी सांगावं की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी काँग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार ९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये. पाकिस्तानी कलाकारांना ढुंगणावर लाथ मारू हाकलण्याची भूमिका घेणारा पक्ष कोणता होता? पाकिस्तानी कलाकारांना घ्याल, तर याद राखा ही नोटीस सगळ्या निर्मात्यांना कुणाकडून गेली होती? आझाद मैदानावर रझा अकादमीनं मोर्चा काढला, पोलीस भगिनींना मारलं, पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, पोलिसांना मारलं. कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. त्यानंतर तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर अरुप पटनायक आमच्या पोलिसांवरच डाफरत होते. हे पोलिसांना सांगत होते की त्यांना मारायचं नाही. तो मोर्चा आरूप पटनायक यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यासाठी. त्यानंतर अरूण पटनायक यांना पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आलं. तो मोर्चा आमचा होता.
सगळे गुढी पाडव्याच्या सभेनंतर एकदम सरफटले. एकच पालुपद लावलं की ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं., अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चौफेर फटकारे लगावले.