
मुंबई (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिष्ठित समजला जाणारा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान मोदींना या पुरस्काराने मुंबईत २४ एप्रिल रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास अनुकूलता दर्शवली आहे, अशी माहिती उषा मंगेशकरांनी दिली आहे. नरेंद्र मोदी हे लतादीदींना बहिण मानतात. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराकरिता २४ एप्रिलला त्यांना मुंबईत निमंत्रित करण्यात आले आहे.
उषा मंगेशकर यांच्या हस्ते ‘लता दिनानाथ मंगेशकर’ हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्काराविषयी बोलताना हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘प्रत्येत क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. दीदींच्या ओळखीचा आणि दीदींच्या नावाला शोभेल, असा पुरस्कारार्थी असायला हवा.