जव्हार (वार्ताहर) : तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे मानवांसह पशुपक्ष्यांची काहिली वाढली असून तीव्र उष्णतेमुळे कावळे गतप्राण होत आहेत. उष्णतेचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत चढत आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांची लाहीलाही होत असून उष्णता सहन न झालेले पक्षी गतप्राण होत आहे.
यंदा उन्हाळा जरा लवकरच जोर धरू लागला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा पशुपक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन त्यांना उष्मघाताचा फटका बसत आहे. उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याने पशुपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास सहन करावा लागत असून परिणामी अनेक पशुपक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे.
मानव उन्हापासून सरंक्षण व्हावे म्हणून टोपी, सूती कपडे यांसारख्या गोष्टींचा वापर करत असतो. मात्र, पशुपक्ष्यांकडे अशी कोणतीच सोय-सुविधा नसल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे पक्ष्यांवर परिणाम होतो. उन्हाचा त्रास सहन न झाल्यामुळे उष्मघाताचा झटका बसतो. परिणामी चक्कर येऊन पक्षी गतप्राण होतात. वनविभागासह पशुसंवर्धन विभागाने पशुपक्ष्यांच्या संवर्धनार्थ एकत्र येऊन काम करणे काळाची गरज आहे.
कावळा हा पक्षी इतर वेळी उपद्रवी समजला जातो. उकिरड्यावर आपले खाद्य शोधणारा, मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छतेची वागणूक मिळते. मात्र, याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात; परंतु गेल्या काही दिवसांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे.
डिहायड्रेशन, हिटस्ट्रोकमुळे पशुपक्षी त्रस्त
सध्याच्या तापमानवाढीचा परिणाम पशुपक्ष्यांवर होऊ लागला आहे. प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी शरीराच्या तापमानापेक्षा अधिक असते. त्यामुळे उष्णतेमुळे प्राण्यांना डिहायड्रेशन होते. शरीरातील पाणी कमी होऊन ते आजारी पडतात. त्यांना वेळेवर उपचार मिळाला नाही, तर त्यांचा जीवही जाऊ शकतो. डिहायड्रेशनमुळे त्यांना विविध प्रकारचा त्रास होऊन त्यांचा जीव जाऊ शकतो. पक्षी आकाशात विहार करत असल्यामुळे उष्ण वाऱ्याचा त्रास होऊन त्यांना दम लागतो आणि हिटस्ट्रोक होऊन ते चक्कर येऊन पडतात.
वनविभागाचे तलाव, बंधारे कोरडे
वनविभागाकडून लाखो रुपये खर्चून तलाव व बंधारे बांधले जातात. मात्र, नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच बंधाऱ्यांची पातळी कमी होऊन कोरडे होतात. त्यामुळे पशुपक्ष्यांची पाण्यासाठी वणवण होते. तसेच काही शिकारी सदर हौदात टिसेलसारखे द्रव्य प्राण्यांचा जीव घेण्यासाठी टाकत असल्याने सदर पाणवठेही धोकादायक ठरू लागले आहेत त्यावर वन विभागाने बंधने आणणे आवश्यक आहे.
उष्माघाताची लक्षणे
उष्माघात झालेले पशुपक्षी अस्वस्थ होतात. ते श्वास तोंडावाटे घेतात. अशावेळी त्यांना अशक्तपणा आल्यामुळे ते उडू शकत नाहीत. त्यांचे डोळे निस्तेज होतात, तोंडातून लाळ गळते. नाकपुडीतून रक्तश्राव होतो. परिणामी या सगळ्या गोष्टी सहन न झाल्यामुळे पशुपक्षी दगावतो.