मुंबई : राज्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले असून विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उष्माघातामुळे राज्यात आठ जणांचा मृत्यू, ९२ जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. यात जळगावात तीन, नागपूरात दोन, अकोला, अमरावती आणि उस्मानाबादेत प्रत्येकी एकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. अर्थात जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे, तसतसा हा आकडा बदलता आणि वाढता राहणार हे निश्चित.
विदर्भ, मराठवाड्यात दिवसाच्या कमाल तापमानात वाढ
एप्रिलचा पहिला पंधरवडा जवळपास संपत आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसाचे कमाल तापमान गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सरासरीपेक्षा अधिक आणि ४२ अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. नागपूर विभागात ६२ तर अकोला विभागात १५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नाशिकमध्ये नऊ, तर लातूरमध्ये एका व्यक्तीला उष्माघातामुळे त्रास होत असल्याने उपचार करावे लागले आहेत. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसवर गेला आहे. पुणे विभागात पाच जण उष्माघातामुळे आजारी पडले आहेत.
एप्रिलमध्येच उन्हाची तीव्रता वाढली, तज्ञांची माहिती
राज्याचे साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, रुग्णांचा मृत्यू उष्माघातानेच झाला आहे का, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हानिहाय समिती असते. या समितीने मंजुरी दिल्यानंतरच ही नोंद केली जाते. गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटा वाढल्यामुळे यावर्षी एप्रिलमध्येच उन्हाची तीव्रता जास्त वाढली आहे. परिणामी मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येवरही याचा परिणाम झाला आहे.
आतापर्यंतची आकडेवारी
राज्यात २०१६ – १९, २०१७ – १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ नंतर मात्र हे प्रमाण कमी झाले होते. २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे दोन आणि नऊ रुग्णांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. २०२०-२१ मध्ये उष्माघातामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
काय करावे?
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवणे, पंखे, कूलर असलेल्या, वातानुकूलित खोलीत ठेवावे. शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने बर्फाच्या पाण्याने आंघोळ, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या, आइसपॅक, दिवसभरात ५ ते ६ लिटर ओआरएसचे पाणी द्यावे.
उष्माघात म्हणजे काय?
वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार म्हणडे उष्माघात. सर्वसाधारण शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस (९८.६ अंश फॅरनहाईट) असते. हे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने मेंदूवर, रक्ताभिसरणावर आणि शरीरातल्या रसांवर (एन्झाइम्सवर) प्राणघातक दुष्परिणाम होऊ शकतात. ते टाळण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी एक वातानुकूलन प्रणाली कार्यरत असते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही यंत्रणा पूर्ण कोलमडते. परिणामत: त्या व्यक्तीला घाम येणे, मळमळ, उलट्या, घाबरणे आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तापमान अचानक कमी होणे, चक्कर येणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे, अशी लक्षणे दिसतात. वेळेत उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होते.