मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. मात्र, त्यांना अटकेपासून काही दिवस संरक्षण दिले होते. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
यासंदर्भात प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा होता. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस कोठडीची कोणतीही गरज नव्हती. न्यायालयाने हीच गोष्ट लक्षात घेऊन आज प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
केवळ राजकीय हेतूने सरकारने प्रवीण दरेकर यांना तुरुंगात टाकण्यासाठी हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात कोठडीतील चौकशीची गरज नाही, असे स्पष्ट केले. प्रवीण दरेकर यांना अटक करण्याची गरज नाही. त्यांना अटक झाली तरी त्यांना बाँडवर सोडण्यात येईल, अशी माहिती अखिलेश चौबे यांनी दिली.