नेरळ (वार्ताहर) : नेरळ ग्रामपंचायतमधील वाल्मिकीनगर येथे असलेले सार्वजनिक शौचालय ३ फेब्रुवारी २०२२ रोजी तोडले होते. सदर सार्वजनिक शौचालय तोडल्यानंतर स्थानिक आदिवासींची गैरसोय होत होती. आदिवासी लोकांच्या मागणीनंतर नेरळ ग्रामपंचायतने सदर शौचालयाचे बांधकाम सुरू केले होते. दरम्यान, आता त्या सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण होत आले असून त्यामुळे आदिवासी लोकांची गैरसोय थांबणार आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालय ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायतीने तोडले होते. ग्रामस्थांसाठी पर्यायी व्यवस्था न करता आदिवासी लोकांसाठी आरक्षित असलेल्या वाल्मिकीनगरमधील एका बिगर आदिवासी व्यक्तीने अर्ज करून तोडण्याची मागणी केली होती. त्यावर ग्रामसभेत चर्चा झाली आणि त्यानंतर ते सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले, असा दावा नेरळ ग्रामपंचायतने केला आहे. मात्र त्या भागातील २००हून अधिक कुटुंब त्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होते.
नेरळ ग्रामपंचायतने ते सार्वजनिक शौचालय तोडताना स्थानिकांची पर्यायी व्यवस्था केली नाही. नेरळ ग्रामपंचायतने त्या ठिकाणी १५ वित्त आयोगाच्या निधीमधून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक महिलांची गैरसोय होणार यांची कल्पना असतानाही नेरळ ग्रामपंचायतने तेथील सार्वजनिक शौचालय तोडले होते. त्यामुळे आता ग्रामपंचायतकडून नाहक खर्च करत नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते.
आता या चार बेडच्या सार्वजनिक शौचालयचे काम अंतिम टप्प्यात असून या महिन्यात बांधकाम पूर्ण होऊन ते वापरास दिले जाऊ शकते. मात्र आदिवासी लोकांची गैरसोय करणाऱ्या ग्रामपंचायतच्या धोरणाचे आणि आदिवासी लोकांची गैरसोय दूर होणार असून नाहक खर्च जनतेच्या माथी टाकणाऱ्या प्रशासनाविरुद्ध नाराजी कायम आहे.