ठाणे : देशात समान नागरी कायदा आणा, तसेच लोकसंख्या नियंत्रण करणारा कायदाही आणा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत केली.
यावेळी ते म्हणाले की, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला हा गैरसमज आहे, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. वेळ आल्यास मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही बोलेन. मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोललेत. मी एखादं स्वप्न एका पंतप्रधानाकडून पाहतो. ३० वर्षांनंतर एका व्यक्तीला पूर्ण बहुमत मिळाल्यावर ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्याबाबत मी एका भाषणातही बोललो होतो. मी उघडपणे मोदींच्या भूमिकांविषयी बोललो. पण काश्मीरमधलं ३७० कलम त्यांनी रद्द केलं, तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्वीट माझं होतं. आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, हा देश एक दिवस फुटेल. या काही गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहेत, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
त्याआधी, सभेला सुरुवात करतानाच त्यांनी सांगितले की, माझ्या सभेपूर्वी पोलिसांचा आपल्याला फोन आला त्यावेळी त्यांनी माझा ताफा काही छोट्या संघटना अडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळलं मात्र, पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे पोलिसांना कळलं नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी तारे तोडल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान, मनसेकडून ठाण्यातील उत्तर सभेपूर्वी तीन टीझर रीलीज केले होते. 9 एप्रिल रोजी मनसेकडून करारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी ”वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे” असा उल्लेख करत दुसरा तर, त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ असा उल्लेख करत तिसरा टीझर रिलीज करण्यात आला. गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे आजच्या ठाण्यातील सभेत या सर्व राजकीय प्रतिक्रियांना उत्तर देणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.