वाडा (वार्ताहर) : भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले असून हे काम जिजाऊ कंट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. त्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याने येत्या काही दिवसांतच हा रस्ता चांगला होऊन वाहने सुसाट धावणार आहेत.
भिवंडी-वाडा-मनोर हा रस्ता बांधा वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर शासनाने सुपीम कंपनीला गेल्या दहा वर्षापूर्वी दिला होता. कंपनीने मनोर ते वाडा या रस्त्याचे काम दर्जेदार केले, मात्र वाडा ते भिवंडी या अंतराचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता खड्ड्यात जातो. पावसाळ्यात खड्डे पडले की पावसानंतर त्याची डागडुजी करून रस्ता सुस्थितीत करण्यात येतो. मात्र गेल्या तीन ते पाच वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेला होता. त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जायबंदी झाले आहेत.
खराब रस्त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता सुपीम कंपनीकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागानेही गेल्या पावसाळ्यात रस्त्याची दुरुस्ती न केल्याने पावसानंतर हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे उखडला गेला होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत होती.
वाहनांच्या नुकसानाला खराब रस्ता कारणीभूत
खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. अनेक वाहने मोठमोठ्या खड्ड्यात पडल्याने उलटून त्यांचे नुकसान झाले होते. खराब रस्त्यामुळे वाडावासीयांना भिवंडी ठाणे येथे जाण्यासाठी पाइपलाइन मार्गे किंवा मनोर अहमदाबाद हायवेमार्गे जात असत. रस्ता सुस्थितीत व्हावा म्हणून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा आंदोलने करून सरकारचे लक्ष या रस्त्याकडे वेधले.