Tuesday, March 25, 2025
Homeमहत्वाची बातमीभगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान

शिबानी जोशी

गणेशोत्सव यायला चार महिने असले तरी महाराष्ट्रात त्याच्याशी निगडित कामांची सुरुवात हळूहळू व्हायला सुरुवात होते. कोकणाचं आणि गणपती उत्सवाचं एक विशेष नात आहे. कोकणात गणेशोत्सवात दिवाळी पेक्षाही जास्त उलाढाल होत असते. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० हजारांपेक्षा जास्त गणेशमूर्ती बनवल्या जातात, असा अंदाज आहे. यासाठी तिथली स्थानिक माती वापरली जात असे. मात्र खाणीमधून मिळणाऱ्या मातीच वजन, किंमत यांचे गुणोत्तर दिवसेंदिवस वाढतच आहे. खाणीतून मिळणाऱ्या मातीचा एक इंच थर तयार व्हायला आठशे वर्षे लागतात. तसेच त्याची वाढती किंमत लक्षात घेता पीओपीचे गणपती बनवण्याची कल्पना आपल्याकडे सुरू झाली; परंतु पीओपीमुळे जल प्रदूषणाचे प्रमाण वाढत असे, हे लक्षात घेऊन कोकणातील भगीरथ प्रतिष्ठान या संस्थेने गोमय गणपती निर्मिती सुरू केली आहे. भगीरथ प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था विविध प्रकारचे उपक्रम कोकणात राबवून ग्रामविकासाच्या कामात खूप मोठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गाईचं शेण आणि त्या त्या गावात मिळणारी स्थानिक माती एका विशिष्ट प्रमाणात एकत्र मिळवून गणपती तयार केले, तर ते विसर्जन झाल्यावर चार तासांत पाण्यात वितळतात. विलास मळगावकर यांनी खूप संशोधन करून ही मूर्ती तयार करण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलं आहे. गेल्या वर्षी विनोद तावडे, जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, नायर यांनीही या मूर्ती घेतल्या होत्या. आता हे काम भगीरथ प्रतिष्ठाननी का सुरू केलं ते जाणून घेऊया.

भगीरथ प्रतिष्ठान या संस्थेची २००४ साली डॉक्टर प्रसाद देवधर यांनी झाराप या गावांमध्ये त्यांच्या छोट्याशा क्लिनिकमध्ये मुहूर्तमेढ रोवली. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या गरजा भागल्या तर तो सहज सुखी म्हणवला जाऊ शकतो, त्याच्या गरजा काय? हे लक्षात घेऊन देवधर यांच्यासारखे काही बहिर्मुख व्यक्तिमत्त्व काम करत असतात. देवधर यांनीही तसंच काम सुरू केलं. समाजातील प्रश्न दिसला की, त्यावर काम करायचं असं ठरवत भगीरथ प्रतिष्ठान विविध क्षेत्रात काम करत आहे. बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, महिला बचत गट, जलस्वराज्य, पाणी वाटप, विहिरींची सफाई, शालेय शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत भगीरथ प्रतिष्ठान कार्य करत आहे. या सर्व कार्याचं बीजारोपण डॉक्टर देवधर यांच्या मनात १९९३ साली किल्लारीचा भूकंप काळात मदतीला गेले असताना झालं आणि दोन हजार साली कच्छमधील भूकंपादरम्यान मदतीला गेले असताना या बीजानं आकार घेतला. कच्छमध्ये

नेदरलँड्समधून एक टीम मदत आणि पुनर्वसनसाठी आली होती. सहज म्हणून चौकशी करताना त्यांच्याकडून समजलं की, जोवर संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोवर ते इथेच राहणार आहेत. हजारो मैलावरून आलेली माणसं इतक्या स्वयंप्रेरणेने काम करतात, तर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कोणत्याही इझमच्या बेड्यात न अडकता आपणही असं काम करावं असा मनोदय देवधरांच्या मनात अधिक पक्का झाला आणि समाजकार्याचा विस्तार २००४ मध्ये सुरू झाला. डॉक्टर देवधर यांच्या वडिलांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगला संबंध होता. प्रसाद देवधर यांना मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जवळची वाटली. समाजात वावरताना समाजा अनुकूल भूमिका असावी असं त्यांचं मत होतं. त्यामुळे ९३ साली झालेल्या भूकंपादरम्यान आपणही मदतीला जायला हवं असा विचार करून काही मित्रांसह तेथे पोहोचले. मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम त्यांना करावे लागले. त्यानंतर मेडिकलचे शिक्षण घेत असताना दुसरी हाऊस पोस्ट त्यांनी लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात स्वीकारली. तिथून परतल्यावर त्याने झारापमध्ये आपल्या क्लिनिकला प्रारंभ केला आणि त्याच वेळी सामाजिक विचार कृतीत परावर्तित करायला प्रारंभ केला. बायोगॅस चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं.

चुलीच्या धुराने त्रासणारी घरच्या महिला बायोगॅस वापरू लागल्या व तिची कार्यक्षमता झपाट्याने वाढली. घरात ती जास्त वेळ देऊ शकतेय. आज कोकणातल्या परिसरात सुमारे ९००० बायोगॅस प्लांट तयार केले आहेत. एखादं चांगलं काम सुरू केलं की अनेक हात मदतीला येत असतात. वेगवेगळ्या संस्थांचा ग्रामविकासाची नवीन मॉडेल रुजविण्यात सहभाग घेण्याचा प्रयत्न असतो. नाबार्डकडून ‘व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ ही योजना आली. वित्तपुरवठा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देण्याची योजना होती. बँका कर्ज देताना पत पाहतात; परंतु दरिद्री शेतकऱ्याकडे ही पत कुठून येणार? त्यामुळे त्याला हे कर्ज मिळत नसेल त्यावर उपाय म्हणून नाबार्डने बँकांना वित्तपुरवठा करायचा, भगीरथन शिफारस पत्र द्यायचं आणि बँकेने त्या व्यक्तीला तत्काळ कर्ज द्यायचं अशी योजना सुरू झाली. भगीरथ स्थानिक शेतकऱ्यांची विश्वासार्हता पाहून त्यांना शिफारस पत्र देते. आजपर्यंत भगीरथच्या माध्यमातून दिलेल्या कर्जाचा एनपीए शून्य टक्के आहे. त्यानंतर कोंबड्या पालन, अंडी, शेळी-मेंढी पालन हे उपक्रमही भगीरथने राबवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. महिला बचत गटाप्रमाणेच पुरुष बचत गटालाही मदतीचा हात दिला आहे. एका गावातील पुरुष बचत गटाने लग्नकार्यासाठीची भांडी खरेदी केली. त्याआधी परगावातून भांडी येत असत, त्यासाठी प्रवास खर्च होत असे. आता गावातच निम्म्या खर्चात ही भांडी मिळू लागल्याने स्थानिकांचे पैसेही वाचले आणि पुरुषांच्या हाताला कामही मिळाले आहे.

अंड्यांच्या क्षेत्रात मोठं परिवर्तन असेच घडले आहे.देवधर यांच्या लक्षात आलं की, सावंतवाडी जिल्ह्यात कर्नाटकातून अंडी देतात आणि जिल्ह्याची अंड्याची गरज दरमहा २० लाख आहे. हेच उत्पन्न आपल्या जिल्ह्यात घेतलं तर रोजगारही मिळेल आणि गरज भागेल असा विचार करून त्यावर संशोधन सुरू झालं आणि वेंकीज कंपनी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि भगीरथ मिळून प्रकल्प राबवायला सुरुवात झाली. आता इथे सुमारे दोन लाख अंडी निर्माण होत आहेत. स्थानिकांना कर्ज स्वरूपात रक्कम मिळते, त्यातून ते हा व्यवसाय उभा करू शकतात. याशिवाय मधुमक्षिकापालन, गांडूळ खत निर्मिती याची प्रशिक्षणही संस्थेच्या वतीने दिली जातात. महिलांना शिवण यंत्र किंवा घरघंटी देण्याच्या उपक्रमांतूनही आर्थिक उलाढाली सुरू असतात. ग्रामविकास हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून काम सुरू आहे. नानाजी देशमुख, डॉ. अभय बंग, डॉक्टर राजेश गुप्ता यांच्यासारख्या व्यक्तीचा प्रभाव डॉक्टर देवधर यांच्यावर दिसून येतो. इतकं मोठं काम हे एकट्या-दुकट्याचं नसतंच, त्यामुळे लोकसहभागाचा आग्रह देवधर यांनी नेहमीच धरलाय, कोणतंही काम लादायचं नाही; परंतु स्थानिकांच्या हितासाठीच ही कामं सुरू आहेत हे कळल्यावर ते आपोआपच कामांशी जोडले जातात आणि असंच हे काम एका गावातून दुसऱ्या गावात पाझरत, हे भगीरथ प्रतिष्ठानच्या कामांतून दिसून येत.

खरं तर आपली वैद्यकीय प्रॅक्टिस उत्तम सुरू असताना हेतुपुरस्सर डॉक्टर प्रसाद देवधर यांनी हे काम सुरू केलं. कारण सामाजिक कार्य ही आंतरिक ऊर्मी असते आणि ती ऊर्मीच एवढं मोठं काम नि:स्वार्थीपणे उभं करायला मदत करत असते हेच डॉक्टर प्रसाद देवधर यांच्याकडे पाहून लक्षात येतं.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -