गाझियाबादः उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील इंदिरापुरम भागातील झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागली होती. या घटनेत १०० गायींचा होरपळून मृत्यू झाल्याचे आज उघडकीस आले.
झोपडपट्टीला लागलेल्या आगीत घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले, त्यातच झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या ढीगा-याला आग लागली. हवेमुळे आग पसरल्याने त्याचे रुपांतर भीषण आगीत झाले. आगीने संपूर्ण परिसर वेढल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग लागल्याची घटना घडताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.
अग्निशमन दल तिथे पोहचेपर्यंत स्थानिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आग वाढतच होती. अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहचल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत १०० गायींचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या दुभत्या गायी नसल्याचे श्री कृष्णा गौसेवेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे.