
विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली असून खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील धोडीपाडा येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी विक्रमगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागात पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे.
तालुक्यातील हा भाग दुर्गम असून या भागात विहिरीच्या पाण्याची व बोअरवेलची पातळी खाली गेल्याने या भागात पाणीटंचाई सुरवात झाली आहे. दरवर्षी या भागात पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पाणीटंचाई कशी दूर होईल, यासाठी योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान या पाणीटंचाईमुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाने याठिकाणी तातडीने टँकर सुरू करावेत जेणेकरून महिलाना पाण्यासाठी फिरावे लागणार नाही.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी विंधण विहीर मारण्यात येतात. त्याही वेळेत माराव्या, जेणेकरून टंचाई दूर होईल. तथापि, असे होताना दिसत नाही. आराखडा मंजूर होतो केव्हा व बोअरवेल मारतात केव्हा, याची ग्रामस्थ वाट पाहत आहेत. मागील वर्षी मंजूर झालेले बोअरवेल लवकरात लवकर मारण्यात यावेत, जेणेकरून या भागातील टंचाई दूर होऊ शकते, अशी मागणी पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे. तसेच पाणी लागेल अशाच ठिकाणी बोअरवेल मारण्यात यावे, जेणेकरून हे बोअरवेल पाण्याविना राहणार नाही, अशीही मागणी करण्यात येत आहे.
सर्वेक्षण करावे
दरम्यान या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील कोणकोणत्या पाड्यांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे, याचे सर्वेक्षण करण्यात यावे, जेणेकरून टँकरची मागणी करता येईल, अशी अपेक्षा येथील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी केली आहे.