Wednesday, November 12, 2025

पंतप्रधान योजनेंतर्गत तीन कोटी घरे बांधून पूर्ण

पंतप्रधान योजनेंतर्गत तीन कोटी घरे बांधून पूर्ण

ठाणे (प्रतिनिधी) : गोरगरिबांचे मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ३.१० कोटी पक्की घरे देशभर बांधण्यात आली आहेत. या योजनेसाठी ३ लाख कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत ६ लाख ६८ हजार ३६३ बांधून देण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले, देशातील प्रत्येक गोरगरीब माणसाच्या मालकीचे घर असावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात होत आहे. ग्रामीण भागात २.५२ कोटी घरे बांधून देण्यात आली आहेत, तर शहरी आवास योजनेअंतर्गत ५८ लाख पक्की घरे बांधण्यात आली आहेत.

ग्रामीण आवास योजनेअंतर्गत १.९५ लाख कोटी इतके अर्थसहाय्य गरजूंना देण्यात आले आहे. शहरी आवास योजनेअंतर्गत १.१८ लाख कोटी इतके अर्थसहाय्य लाभार्थींना देण्यात आले आहेत. गरीब माणसाला हक्काचे घर असले की, त्याच्या जीवनाला स्थैर्य मिळून तो आपल्या उत्पन्नवाढीसाठी अधिक जोमाने नवे प्रयत्न करू शकतो, हे ओळखून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेखाली बांधून देण्यात येणाऱ्या घरात उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मोफत दिले जाते, तसेच शौचालय, पाणीपुरवठा, वीज कनेक्शन या सुविधाही दिल्या जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment