Wednesday, February 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाणेकरांना आता पाणीकपातीचे ‘नो-टेन्शन!’

ठाणेकरांना आता पाणीकपातीचे ‘नो-टेन्शन!’

बारवी धरणातील पाणीसाठ्यामुळे टळणार संकट

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या बारवी धरणात यंदा एप्रिल महिना उजाडला तरी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बदलापूरजवळ बारवी धरण आहे, ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामधील निम्म्याहून अधिक नागरी तसेच औद्योगिक भागाला दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यापासून लागू होणारी पाणीकपात तूर्तास तरी टळली आहे.

तसेच धरण क्षेत्रात आजही ५० टक्क्याहून अधिक पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असा दावा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. बारवी धरणातून कल्याण-डोंबिवली पालिका, एमआयडीसी, २७ गावे, बदलापूर-अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबई, ठाणे पालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा, तळोजा औद्योगिक क्षेत्र, मीरा-भाईंदर शहरांना दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो.

या धरणातून दररोज सुमारे नऊशे ते अकराशे दशलक्ष लिटर पाणी वितरित केले जाते. दरवर्षी १५ जूनपर्यंत पुरेल इतक्या धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणीकपात लागू करण्यात येते. यामुळे शहरांचा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. पाऊस सुरू होईपर्यंत ही कपात लागू असते; परंतु मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक आहे.

बारवी धरणातून पाणी वितरण करण्याची जबाबदारी एमआयडीसीची असली तरी पाणीकपात आणि शहराला पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण ठरविण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. या विभागाकडून पाणीकपातीसंदर्भात कोणत्याही सूचना एमआयडीसीला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी पाणीकपातीची कोणतीही चिन्हे नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -