झारखंड : झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये अनेक पर्यटक ट्रॉलीत अडकले आहेत. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. देवघरमध्ये त्रिकुटी डोंगरावर रोपवेची एक ट्रॉली वरुन खाली येत असताना, खालून वर जाणा-या एका ट्रॉलीला धडकून हा भीषण अपघात झाला. दरम्यान आज दुपारपर्यंत १८ पर्यटकांना बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले आहे.
काल दुपारची ही घटना असून अजूनही ४८ जण या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सध्या एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या मदतीनं आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.
देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. त्यांना सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी एनडीआरएफचं पथक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना संयम राखण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे.