मुंबई : शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला याप्रकरणी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते प्रविण दरेकरांनी केली आहे. हल्ला झाला त्या दिवशी विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल झालेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये होते. ते काल गृहमंत्री दिलीप- वळसे पाटलांच्या भेटीला गेले होते, असेही ते म्हणाले.
किरीट सोमय्या हे त्यांचा मुलगा नील सोमय्यासह फरार झाले आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपाला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्यूत्तर दिले. सोमय्यांनी पळून जाण्याचे काही कारण नाही. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. त्याचा निकाल येईपर्यंत कोणीही समोर येणार नाही. निकाल आल्यानंतर पोलिसांना ते सामोरे जातील, असेही ते म्हणाले.
साप म्हणून भुई थोपटणे हे संजय राऊतांचे काम आहे. त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही. जंग-जंग पछाडून भाजपाच्या नेत्यांना अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राऊत यांना सूर सापडत नाही म्हणून शोध घेत असतात. सरकारचा वापर करून गुन्हे दाखल करायचे, अटक करायचे असे नियोजनबध्द ते करतात. मात्र भाजपातील सर्व नेते कायद्याला सहकार्य करतील.
माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरणी भाजप नेते प्रविण दरेकर यांची पुन्हा चौकशी होणार आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत त्यांनी सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. माझी छळवणूक करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र चौकशीला सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘आप’ने केलेल्या आरोपावर ते म्हणाले, केलेल्या आरोपावर अब्रुनुकसानाचा दावा दाखल करणार आहे. मुंबै बॅंक मजूर घोटाळ्यातील बेछूट आरोपांप्रकरणी नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.