तलासरी (वार्ताहर) : तलासरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा सवणेमधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सहा महिन्यांपूर्वी दापचरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शनिवारी आदिवासी विकास विभागामार्फत दोन लाखांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
सवणे शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विक्रम मगन पाटकर याने दापचरी येथे ३ ऑक्टोबर रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या मुलाच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने वडवली गावचे माजी उपसरपंच सुनील टोकरे, तसेच मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील यांच्या प्रयत्नांतून आदिवासी विकास प्रकल्प डहाणूतून विक्रमच्या वारसांना दोन लाखांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश विक्रमची आई साखरू मगन पाटकर यांना देण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच सुनील टोकरे मुख्याध्यापक व्ही.एम. पाटकर तसेच सवणे आश्रमशाळेचे शिक्षक, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे रत्ना वाढीया,राजेश वाढीया, रुपेश वाढीया, जयवंत धोदडे, भरत वेडगा इत्यादींसह ग्रामस्थ उपस्थित होते.