Tuesday, December 3, 2024
Homeमहामुंबईझोपड्या हटवण्याच्या विषयाबाबत राज ठाकरेंची भेट: रावसाहेब दानवे

झोपड्या हटवण्याच्या विषयाबाबत राज ठाकरेंची भेट: रावसाहेब दानवे

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आता रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचं नेमकं कारण काय आणि राज ठाकरेंसोबत काय चर्चा झाली, याबद्दल रावसाहेब दानवे यांनी माहिती दिली आहे. “मुंबईत रेल्वेच्या जागेवर काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी या झोपडपट्ट्या हटवण्याची मागणी केली होती. यानंतर मी सर्वपक्षीय बैठक घेतली.

त्या बैठकीत या झोपडपट्ट्या हटवू नये, असं म्हटलंय. तर, या झोपड्या हटवण्याच्या विषयासंदर्भात मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्याच प्रमाणे मी राज ठाकरेंची भेट घेतली,” असे रावसाहेब दानवे म्हणाले. “काळाच्या पोटात काय आहे, हे आता सांगण कठीण आहे. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांच्या पोटात दुखतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राज ठाकरे बोलले तर आघाडीमधील नेत्यांना चांगलं वाटतं. एखाद्याच्या कामामुळे त्याच्याबद्दलचं मत बदलू शकतं. मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंना आघाडीतील नेत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. अलिकडे झालेल्या निवडणुकीत पाच राज्यांपैकी चार राज्ये आम्ही जिंकली, त्याचं कौतुक फक्त राज ठाकरेंनी केलं.

चांगल्या कामाचं कौतुक नको का करायला?” असा प्रश्न रावसाहेब दानवेंनी विचारला. “राज ठाकरेंनी त्यांचं परप्रांतीयांबद्दलचं धोरण बदलल्यास भाजपा-मनसे युती होणार ही शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा वेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष सोबत येतात, तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात आणि काही मुद्दे सोडून द्यावे लागतात,” असे दानवे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -