मुलुंड (वार्ताहर) : चुकीच्या मार्गाने ड्रायविंग व हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांविरोधात एक विशेष अभियान दि ५ ते ७ एप्रिल दरम्यान मुलुंड पूर्वेतील रस्त्यावर कांजूरमार्ग वाहतूक विभागातर्फे चालविण्यात आले. यावेळी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्यावर कारवाई केली. हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांना कांजूरमार्ग वाहतूक विभाग येथे बोलावून तेथे त्यांना वाहतूक नियम व्यवस्थित समजावून सांगण्यात आले तसेच मार्गदर्शन करण्यात आले.
वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासंदर्भात विविध व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले. नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना यावेळी समजपत्र देण्यात आले व यापुढे पुन्हा नियम मोडल्याचे आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली.
कांजूरमार्ग वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान मुलुंड पूर्वेतील सर्व चौकात व महत्त्वाच्या रस्त्यावर राबवण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिसांनी विशेष मेहनत घेत स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे दुचाकीस्वारांना समजावले.