Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमनसे ठरणार हुकूमाचा एक्का?

मनसे ठरणार हुकूमाचा एक्का?

मुंबई महापालिका आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका. या महापालिकेत आपली सत्ता व्हावी म्हणून सगळेच पक्ष आपल्या तयारीत लागले आहे. मात्र या निवडणुकीत हुकूमाचा एक्का ठरणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

सध्या मुंबईत केवळ मनसेचा एकच नगरसेवक आहे, तर महाराष्ट्रात एकच आमदार. मात्र तरीही मनसे सध्याच्या राजकीय घडामोडीत सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. २ एप्रिलला गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये मनसेच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. गेले दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये सत्ताधारी पक्ष सोडून कोणत्याच पक्षांच्या हालचाली सुरू नव्हत्या. तर केवळ एक नगरसेवक आणि एक आमदार म्हणून मनसे गेले काही महिने शांत होता. मात्र आता गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे पुन्हा एकदा जिवंत झाली आणि आता तर सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष मनसेकडे लागले आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसेने केलेल्या शक्ती प्रदर्शनातून हेच सिद्ध होत आहे. ते म्हणजे येत्या काळात मनसेच्या भूमिकेवर अनेक पक्षांची मतं ठरली आहेत.

सध्या मनसेने आपला भगवा झेंडा केल्यानंतर मनसेने हिंदुत्वाची कास धरली आहे. त्यामुळे भाजप मनसेला आपला जवळचा पक्ष करण्याच्या तयारीत आहे. भाजप-मनसे युती होणार की नाही, हा राहिला नंतरचा प्रश्न. मात्र सध्या भाजप आणि मनसेची भूमिका एकच दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे भविष्यातील राजकारण बद्दलण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यानंतर भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली होती. मात्र मनसेच्या काही नेत्यांनी युती होणार नाही हे स्पष्ट करत ही चर्चा मावळली होती, तर २ एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केल्यानंतर आणि मशिदीतील भोंग्याच्या विरोधात बोलून हिंदुत्ववादाची कास धरल्यानंतर भाजप-मनसे युती करणार का? ही चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली. तर आज केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री राबसाहेब दानवे यांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढत असून पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावर युतीची चर्चा सुरू झाली आहे.

मनसेमध्ये केवळ एक आमदार आणि मुंबई महापालिकेवर एक नगरसेवक असल्याने पक्षाची ओळख जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता राजकीय घडामोडी पाहता मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार झाली असून नक्कीच या तयारीचा फायदा मनसे आणि भाजपला भविष्यात होईल असे दिसत आहे,

सध्याचे मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता

– शिवसेना – ९९, भाजप – ८३, काँग्रेस – ३०,राष्ट्रवादी – ८, समाजवादी पार्टी – ६, मनसे – १, एमआयएम – २ आहे, तर २०१७च्या निवडणुकीत मनसेतून ६ नगरसेवक गेल्याने शिवसेनेची संख्या वाढली होती. आताच्या महापालिका निवडणुकीत मात्र भाजप एकहाती सत्ता घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढायच्या तयारीत असली तरी भाजप आणि मनसे युतीची चर्चा जोरदार सुरू आहे. जरी भाजप- मनसे युती झाली नाही तर भाजप आणि मनसेमध्ये अंडरस्टँडिंग फॉर्म्युला वापरण्याची शक्यता आहे.
भाजपने आधीच मिशन १३४ अधिक जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपला २३६ पैकी १०० हून अधिक तरी नगरसेवक निवडणूक आणावे लागणार आहेत, तर शिवसेनेचे संख्याबळ ६० ते ८०च्या पुढे जाता कामा नये यासाठी मनसेला सोबत घेऊन भाजपला प्रयत्न करावे लागणार आहे. तर ज्या विभागात शिवसेनेचा उमेदवार मजबूत असेल तिथे मनसेचा उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता आहे, म्हणजे मराठी मताचे विभाजन होईल, तर जिथे भाजपचा मजबूत उमेदवार उभा असेल तिथे मनसेचा कमी बळ असलेला उमेदवार उभा केला जाईल. एकूणच काय तर मनसेला भाजपची अंतर्गत मदत आणि भाजपला मनसेची साथ अशा प्रकारे मुंबई महापालिका निवडणुकीची समीकरणे जुळली जाण्याची शक्यता आहे.

सीमा दाते seemadatte@@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -