Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीइम्रान खान यांची विकेट, आता शरीफ मैदानात!

इम्रान खान यांची विकेट, आता शरीफ मैदानात!

पाकमध्ये विरोधकांच्या अचूक खेळीने इम्रान सरकार कोसळले

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा पहिला अंक शनिवारी मध्यरात्री उशिरा पाक संसदेमधील नाट्यमय घडामोडींनंतर संपला. रात्री उशिरा पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. पाक संसदेतील तब्बल १७४ सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात मतदान केल्यामुळे अखेर इम्रान खान यांची विकेट पडली असून पंतप्रधानपदावरून ते पायउतार झाले आहेत. अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. दरम्यान इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटविल्यानंतर विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.

पाकिस्तानात आजवर कोणत्याही सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. आता इम्रान खान यांनाही मोठ्या राजकीय नाट्यानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाकच्या संसदेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्रान यांचा पक्ष ‘पीटीआय’च्या सदस्यांनीही सभागृहातून काढता पाय घेतला. पुढचे कामकाज पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी चालवले. अविश्वास ठरावावर मध्यरात्रीनंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा ठराव अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी जिंकला. इम्रान यांच्यावर १७४ सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला व ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सादिक यांनी बहुमताने हा ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले.

याआधी गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र पाकच्या संसदेचे अध्यक्ष कासिम सुरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. मात्र, हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कासिम सुरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवत अविश्वास ठरावाची वाट मोकळी करून दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -