नांदगाव (वार्ताहर) : वादळी वारे आणि पाऊस याचा फटका सिंधुदुर्गातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर बसला असून तेथील आंबा, काजूच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक झाडे उन्मळून पडली असून कित्येक घरांची छप्परे उडाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. तर नांदगाव महावितरणचे कर्मचारी संजय नाडकर्णी हे सेवा बजावत असताना विजेच्या खांबावरून पडून जखमी झाले आहेत. त्याचबरोबर नांदगावसह तोंडवली, बावशी, असलदे, पियाळी, मठखुर्द, आयनल, कोळोशी या भागांतही वादळाचा फटका बसला असून याठिकाणी अनेक आंबा व काजूच्या बागांचे नुकसान झाले आहे.
नांदगाव दशक्रोशीत वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मेघगर्जनेसह झालेल्या पावसाचा फटका परिसरातील अनेक घरांसह, फळबागांना बसला आहे. बागेतील काजू व आंबा खाली पडून जमीनदोस्त झाला. नांदगावसह परिसरातील गावांचे अजूनही पंचनामे पूर्ण करण्याची कामे सुरू असून नुकसानीची रक्कम अजून वाढणार आहे. तरी आतापर्यंत एप्रिलमध्ये झालेल्या वादळी पावसाचा तळेरे व नांदगाव परिसराला मोठा फटका बसला आहे. नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी नागरिक, बागायतदार करत असून शासन, लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
वैभववाडीत फटका
वैभववाडी तालुक्याला वादळाचा मोठा फटका बसला आहे. सांगुळवाडी, नावळे, सडुरे, अरुळे, कुर्ली, खांबाळे, आचिर्णे या सात गावांतील सुमारे ७२ घरांची पडझड झाली आहे. एकूण अंदाजे २ लाख ५६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका खांबाळे गावाला बसला आहे. गावातील सुमारे ५२ घरांचे सुमारे २ लाख ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. याबरोबरच काजू, आंबा, बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा त्वरित करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आ. नितेश राणे यांनी केली नुकसानीची पाहणी
कणकवली तालुक्यातील नांदगाव खालची मुस्लीमवाडी येथे नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळी पावसाने घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. आमदार नितेश राणे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांशी पंचनाम्याविषयी चर्चा केली. नुकसानग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, शक्तिकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच श्रीमती अफरोजा नावलेकर, कृषी सेवक नीलेश कावले, ग्रामसेवक हरमलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.