
नवी मुंबई (प्रतिनिधी) : कर्णधार केन विलियम्सन (५७ धावा) आणि अभिषेक शर्मा (४२ धावा) यांची धडाकेबाज सलामी आणि निकोलस पुरनच्या १८ चेंडूंत नाबाद ३४ धावा या जोरावर हैदराबादने गुजरातची विजयी घोडदौड रोखली. या विजयासह हैदराबादने यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला.
गुजरातच्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली. अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियम्सन या सलामीवीरांच्या जोडगोळीने हैदराबादच्या धावफलकावर नाबाद अर्धशतक झळकावले. अनुभवी राशीद खानने ३२ चेंडूंत ४२ धावांवर खेळणाऱ्या अभिषेक शर्माचा अडथळा दूर करत गुजरातला पहिला बळी मिळवून दिला.
त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याला राहुल त्रिपाठी चांगली साथ देत होता. दुखापतीमुळे राहुल त्रिपाठी रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर विलियम्सनचाही संयम सुटला. त्याने ४६ चेंडूंत ५७ धावांचे मोलाचे योगदान दिले. निकोलस पुरनने १८ चेंडूंत नाबाद ३४ धावा लगावत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या २४ असताना शुबमन गीलच्या रुपाने गुजरातला पहिला धक्का बसला. मॅथ्यू वेड आणि साई सुदर्शन यांची जोडी स्थीर होत आहे असे वाटत असतानाच नटराजनने साई सुदर्शनला विलियम्सनकरवी झेलबाद करत गुजरातला दुसरा धक्का दिला. त्यानंतर वेडही फार काळ टिकला नाही. त्यामुळे ६४ धावांवर त्यांचे ३ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याला डेवीड मीलरने थोडीशी साथ दिली पण त्यानंतर त्याचाही संयम राहीला नाही. अभिनव मनोहरने पंड्याच्या जोडीने गुजरातचे धावफलक खेळते ठेवले. पंड्याने ४२ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या. तर अभिनव मनोहरने २१ चेंडूंत ३५ धावा तडकावल्या.
हैदराबादच्या भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी २ विकेट मिळवले पण त्यांना धावा रोखणे काही जमले नाही. त्यात वॉशींग्टन सुंदरने ३ षटके अप्रतिम टाकत अवघ्या १४ धावा दिल्या. मारको जेसनने ४ षटकांमध्ये २७ धावा देत १ बळी मिळवला.