नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील घणसोली परिसरात भर उन्हाळ्यामध्ये गर्मीच्या कालावधीत मागील तीन दिवसांपासून अनेकदा वीज खंडित होत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
घणसोली विभाग कार्यालय परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार नवीन नाही. मागील वर्षीसुद्धा मार्चनंतर उन्हाळ्यास सुरुवात झाली की, त्यानंतर वीज गायब होण्याचे प्रकार नियमित होत होते; परंतु यावर्षीचा उन्हाळा सुरू होऊन गर्मीस प्रारंभ झाल्यावर पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व वाहिन्यांवर ताण पडत असल्याने विद्युत वाहिन्या तुटून, वीज गुल होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी अनेकदा वीज खंडित झाली. आजच्या घडीला उष्णतेचे प्रमाण भयानक असल्याने घामाने नागरिक भिजून जात आहेत. त्यातच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
उष्णता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यंत्रणेवर दाब जादा प्रमाणात पडतो. त्यामुळे यंत्रणा खराब होत आहे.
– बोधनकर, अभियंता, महावितरण.