महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर संपकरी एसटी कर्मचारी चाल करून जातात. तिथे हाय हाय घोषणा देतात. त्यांच्या घराच्या दिशेने दगडफेक करतात आणि जोडे फेकतात हे सर्व टीव्हीच्या पडद्यावर राज्यातील कोट्यवधी जनतेने बघितले. राज्यातील शक्तिमान नेत्याच्या घरावर हल्लाबोल आंदोलन होत असेल, तर सर्वसामान्य जनतेला वाली कोण असा प्रश्न पडतो. भाजपची कावीळ झालेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष सत्तेच्या लोभाने एकत्र आले आणि अडीच वर्षांत पोलीस-प्रशासनाची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली. ठाकरे सरकारमधील या तीनही पक्षांना राज्यातील बारा कोटी जनतेचे काही देणे-घेणे नाही. केवळ मीटर लावून कमाई, असा या सरकारचा कारभार चालू आहे. पारदर्शकता आणि विकास या दोन शब्दांचा या सरकारला विसर पडला आहे. आपल्याच पोलीस खात्याला दरमहा शंभर कोटी वसुलीचे टार्गेट देणारे मंत्री या सरकारमध्ये असल्यावर जनतेची काळजी असणार कशी? ठाकरे सरकारच्या काळात राज्याची अधोगती चालू आहे आणि पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा रोज बभ्रा होतो आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले. अगोदरच दीड वर्षे कोरोनामुळे एसटीला ‘घर घर’ लागली होती, लालपरी रस्त्यावर धावू लागली तोच गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करण्याची दुर्बुद्धी सुचली. त्यांना वेतन, भत्ते कमी आहेत म्हणून त्यांच्याविषयी जनतेला सहानुभूती आहे. कोरोना काळातही त्यांनी जी सेवा दिली त्याचा लोकांना अभिमान आहे. पण विलीनीकरणाचा हट्ट धरून त्यांनी लालपरीची चाके जाम केली. त्याचा परिणाम पासष्ट लाख प्रवाशांना भोगावा लागला. त्यांच्या मागण्यांविषयी सहानुभूती असली तरी त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन बेमुदत चालवले, त्यातून त्यांच्याविषयी जनतेत नाराजी आणि संताप प्रकट झाला. जनतेला वेठीला धरून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी बेमुदत संपाचे हत्यार पुकारले. संप बेकायदेशीर ठरेल म्हणून मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या दु:खात आहोत व आम्ही दुखवटा म्हणून आंदोलन करीत आहोत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मग पाच महिने लढा दिल्यावरही विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसताना गुलाल कशासाठी उधळला? आनंद कशासाठी व्यक्त केला. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू कशासाठी आले? उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर नाराजी व संताप प्रकट करण्यासाठी शे-दीडशे संपकरी कर्मचारी शरद पवारांच्या घराकडे धाव घेतात, हे अनाकलनीय होते. जे न्यायालयात जाऊन मिळाले नाही त्याचा राग पवारांवर काढण्याचा हा प्रयत्न होता का? एसटी कामगारांची वर्षानुवर्षे उपेक्षा होत होती व त्यांना कमी वेतनात राबवून घेतले जात होते, हे वास्तव आहे. कोणत्याच सरकारने त्यांच्या मागण्यांकडे कधीच गांभीर्याने बघितले नाही, हेही खरे आहे. आंदोलनाच्या काळात एसटी कर्मचारी आत्महत्या करू लागले, तेव्हा तरी ठाकरे सरकारचे डोळे उघडायला हवे होते. पण सर्व काही न्यायालयावर सोपवून सरकार वेळकाढूपणा करीत होते. त्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढत होता. हे सरकारच्या लक्षात आले नाही, याचे मोठे आश्चर्य वाटते. संतप्त एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर चाल करून जातील याची कल्पनाच मुंबई पोलिसांना नव्हती, याचेच मोठे आश्चर्य वाटते. शे-दीडशे कर्मचाऱ्यांनी तिथे जी हुल्लडबाजी केली, त्याचे कोणीही समर्थन केलेले नाही, पण ही वेळ त्यांच्यावर का आली व संतप्त कर्मचारी पवारांच्या घरावर चाल करून जाणार हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला समजू नये याचे मोठे आश्चर्य वाटते. मुंबई पोलीस व पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय झोपा काढत होती काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुशल प्रशासक आहेत. राज्यात प्रशासनात व पक्ष संघटनेत त्यांना आघाडीचे स्थान आहे. पोलीस विभाग कमी पडला असे सांगण्याची त्यांच्यावर पाळी आली, हा ठाकरे सरकारला घरचा आहेर आहे. शरद पवारांच्या घरापर्यंत आंदोलक पोहोचू शकतील याची निदान त्यांच्या पक्षाने व त्यांना मानणाऱ्या नेत्यांनी कल्पना केली नव्हती. पोलिसांच्या अगोदर मीडिया तेथे पोहोचतो व नंतर पोलिसांना आंदोलकांनी पवारांच्या घराला धडक मारल्याचे समजले हे पोलिसांना कमीपणाचे आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी तर काही दिवसांपूर्वीच पवारांच्या घरी घुसून जाब विचारू असे भाषण आंदोलकांपुढे केले होते. त्याची नोंद पोलिसांकडे नव्हती का? जर होती तर पोलीस सुस्तावलेले होते का? पवारांच्या घरावर हल्लाबोल झाला, याला जबाबदार कोण याचे उत्तर ठाकरे सरकारने दिले पाहिजे. पकडलेल्या आंदोलकांवर कठोर कारवाई करू असे सांगणे हे गुळमुळीतपणाचे लक्षण आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील निवास्थानासमोर काही महिन्यांपूर्वी महाआघाडीच्या युवा सेनेने हुल्लडबाजी केली होती, तेव्हा आज सिल्व्हर ओकवरून गळे काढणारे कुठे गेले होते? तेही पोलिसांचे अपयश होते की, पोलीस संरक्षणात सारे घडले?