डॉ. स्वप्नजा मोहिते
जिंदगी एक सफर है सुहाना… यहाँ कल क्या हो किसने जाना…? कोणाच्या तरी फोनची कॉलर ट्यून गुणगुणली तेव्हा मी अंधेरी स्टेशनवर भल्यामोठ्या रेल्वे तिकिटाच्या लाइनमध्ये ताटकळत उभी होते. पावसाचे टपोरे थेंब वरच्या पत्र्याला पडलेल्या छिद्रातून बिनधास्त शिरत होते. आधीच घरून स्टेशनवर पोहोचेपर्यंत छान भिजलेच होते. या सुखानो या… या तालावर या थेंबांना… म्हणावं का? खांद्यावर पर्स, एका हाताला भिजलेली छत्री, आणि दुसऱ्या हातात पेंटिंग्जच्या फोटोचा पोर्टफोलिओ सांभाळत मी चर्चगेटला निघाले होते. चर्चगेटला माझ्या जुन्या कॉलेजमधल्या एका प्राध्यापकांना भेटायचं होतं आणि एका आर्टगॅलरीमध्ये पेंटिंग्जबद्दल चर्चा करायची होती. ‘पावसात मस्त भिजायचं, भटकायचं, भिजलेलं कणीस खायचं सोडून काय मागे लावून घेतलीस?’ दिवस-रात्र मला सोबत करणारी भोकऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची सखी कुरकुरलीच तेव्हा! कधी कधी तर ती जाम वैतागते माझ्यावर. नको त्या गोष्टी स्वतःवर ओढून घ्यायची सवयच आहे तुला… ती रागाने धुसफुसते… चिडते… कोपऱ्यात जाऊन बसते. बस यह मेरी जिंदगी है… जो दिल कहे वैसे गुजारू!! मी ही नाक उडवत म्हणते तिला. जिंदगी के पन्ने खोलकर बैठी हूँ… चलो कुछ कहानी लिखते है… कुछ तुम्हारी कुछ मेरी… कोई आपबीती सुनाते है!! मी तिच्याकडे दुर्लक्ष करून पावसाचे थेंब झेलतेय. मुंगीच्या गतीने रांग पुढे सरकते आणि एखादं अप्रूपच बक्षीस मिळावं तसं ते चर्चगेटच तिकीट माझ्या हातात पडतं!
मला मुंबईकरांचं खरंच कौतुक वाटतं. कोणती गाडी कोणत्या फ्लॅटफॉर्मला, किती वाजता येणार याच अदृश्य घड्याळ त्यांच्या डोक्यात सतत टिकटिकत असतं. प्रत्येकजण आपल्याच नादात… जिन्यांवरून, फ्लॅटफॉर्मवरून माणसं धावताहेत… स्लो ट्रेन, फास्ट ट्रेन… एकसंधपणे हलणारी गर्दी… रिपरिपता पाऊस आणि मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल्स! मीही त्या गर्दीचा भाग बनून जाते. अरे पण चर्चगेट लोकल कुठे येणार? कित्येक वर्षांपूर्वी मी ही असंच अदृश्य घड्याळ डोक्यात सांभाळत होते… ते विसरून मी थबकते… गोंधळल्यागत त्या गर्दीकडे पाहत राहते. पण ती कुठे विसरलीय हे सगळं! अगं चल फ्लॅटफॉर्म २ वर फास्ट लोकल लागेल आता… ती मला जवळ जवळ ढकलतेच! धावणाऱ्या गर्दीला पाठ करत मीही धावत सुटते. कशीतरी लोंबकळतच ट्रेन पकडते. हुश्श… दरवाजातून येणारा सुसाट वारा सुखवतो! पावसाचे थेंब ही सोबत येतात. डब्यात खचाखच गर्दी… जस्ट लाइक अ पॅक्ड टिन ऑफ सारडिन्स! मला उगीचच उपमा सुचते. मॅड आहेस तू… ती परत धुसफुसते… हॅण्डलबारला लटकून माझ्याकडे बघत राहते. त्या गर्दीतून वाट काढत कुठले कुठले विक्रेते इअररिंग्स, हेअरबँड, कंगवे, आरसे… काहीबाही विकत फिरतात. त्याही गर्दीत कोणी कोणी कौतुकाने इअररिन्ग्सची डिझाइन्स शोधत राहतात. छोट्या छोट्या खुशीची, आनंदाची पॅकेट्स कुणाकुणाच्या पर्समध्ये विसावतात. हातातला पोर्टफोलिओ सांभाळत मीही एका छोट्या विक्रेत्याकडून आठ-दहा इअररिंग्स घेते तेव्हा तो खुशिनं हसतो. “थँक्यू मॅडम!!” त्याच्या चेहऱ्यावरच हसू मला पुढल्या प्रवासाभर पुरतं! “आता ही इअररिंग्स तू कधी घालणारेयस?” कंबरेवर हात ठेवून ती ठसक्यात विचारते. तिला उत्तर म्हणून मी त्यातलाच एक जोड काढून कानात अडकवून टाकते. “घाईत विसरलेच होते नं कानात घालायला!” माझ्या बाजूला गर्दीत स्वतःला सांभाळत उभी असलेली एकजण माझ्याकडे बघून हसते. “अच्छा दिखता है!” तोडक्या मोडक्या हिंदीत ती सांगते तेव्हा लाखमोलाची हिऱ्याची कुडी कानात घातल्यागत वाटतं मला! माझा चेहरा आणखीनच खुलतो… सखी नाक मुरडते तरीही!
चर्चगेट येतं तेव्हा माझा नेहमीचाच गोंधळ परत जागा होतो. कुठून बाहेर पडायचंय आपल्याला? डायरेक्शन आणि मी याचा नेहमीच घोळ असतो. फ्लॅटफॉर्मवर उतरलेली गर्दी आपल्याच नादात चालत असते… नव्हे वहात असते. गर्दीलाही प्रवाह असतो… मला जाणवत. अरे पण मी कोणत्या प्रवाहात जायचंय? मागून येणारा प्रवाह मला लोटत नेतो… ओके देअर यू आर!! गर्दीबरोबर मी एव्हाना बाहेर पोहोचलेले. समोर रस्त्यावर बससाठी परत लाइन! धुवांधार कोसळता पाऊस… पायाखाली टपटपता चिखल… आणि ट्राफिकचा तो आवाज! उफ!! कितनी यह रफ्तार है जिंदगी की… के आज खो जायेगा मेरा अस्तित्व कही.. के गुम हो जायेगा यह चेहरा कही… और जिंदगी की दौड में… मिट जायेगा मेरा निशां कही!! माझ्याच विचारात मी समोरच्या टॅक्सीचा दरवाजा उघडून आत बसते न बसते तोच पलीकडून एक आजी ही घुसल्या तेव्हाच टॅक्सीत. मी टॅक्सी ड्रायव्हरकडे अपेक्षेने बघते… मैं पहले आई हूं… बोलो इनको! तो हताश नजरेने माझ्याकडे… मी आजींकडे आणि निरागस डोळ्यांनी आजी माझ्याकडे बघत बसतात.
अरे देवा! आता उतरा टॅक्सीतून. सीनिअर सिटीझनना सौजन्य दाखवलं पाहिजे नं! मी दार उघडायला वळले तशी आजींनी माझा हात पकडला. “अगं बस गं! तुला लांब जायचं असेल तर सोड मला वाटेवर… नाहीतरी मी तुला सोडेन… टॅक्सी कशाला सोडायची!” त्यांचं निखळ निरागस हसू माझ्या मनाच्या तळापर्यंत झिरपत गेलं. रूपेरी पांढऱ्या केसांची इवलीशी पोनिटेल बांधलेली… मस्त अबोली कलरचा पंजाबी ड्रेस आणि पायात पावसाळी शूज घातलेल्या आजी मला प्रचंड आवडल्या… का कोण जाणे! त्यांच्या नितळ त्वचेवर असंख्य सुरकुत्या उमटलेल्या आणि सुरकुत्याचं तसंच जाळ चेहऱ्यावरही! चेहऱ्यावर थोडासा थकवा पण हसू मात्र छान, निखळ! भिजल्याची खंत नाही की नाराजी नाही. मला त्याचं प्रपोजल आवडलं. “कुठे जायचंय तुम्हाला?” मी कुतूहलानं विचारलं! एवढ्या पावसात या कुठे निघाल्या असतील. महत्त्वाचं काम असेल काहीतरी! “मला गेट वे ऑफ इंडियाला जायचंय… भिजायला!” डोळे मिचकावत, हसत त्या म्हणाल्या. “अगं एव्हढा सुंदर पाऊस पडतोय… त्यात उधाणलेला समुद्र… तो मस्त असा गेट वे वर येऊन आपटतो आणि त्या लाटा कशा मस्त उसळतात… भिजवतात… टीव्हीवर पाहिलं आणि ठरवलं… आज तिकडे जायचं!” एका दमात त्यांनी सांगून टाकलं. बापरे! वेड्या आहेत का या? या वयात भिजायचं? “भिजायचं काही वय नसत गं! हे सगळं आपल्याच मनात असतं!” माझं मन ओळखल्यागत त्या उत्तरल्या. “मॅडम कहा जाना है?” ड्रायव्हरचा त्रासिक प्रश्न ऐकून मी भानावर आले. “गेट वे चलो!” मी नकळत बोलून गेले. आजी मनापासून हसल्या. अरे या कसल्या गोड हसतात आणि त्यांच्या गालाला खळी पडते.
मी आता त्यांच्या खळीच्या आणि हसण्याच्या प्रेमातच पडले होते. तेवढ्यात त्यांचा फोन रुणझुणला… टिक टिक वाजते डोक्यात… धडधड वाढते ठोक्यात… अरे देवा… दुनियादारी!! “लेकाचा फोन माझ्या! तो मला दुनियादारी म्हणतो… दुनियेच्या उठाठेवी करते म्हणून! म्हणून हीच कॉलर ट्यून ठेवली त्याची!” खुसखुसत त्या म्हणाल्या आणि मी फ्लॅट! कोणत्या मातीतून घडल्या या आजी? “अरे मिळालीय टॅक्सी. तू नको काळजी करू. सोबत आहे एक छान मुलगी. हो, आम्ही कॉम्प्रोमाईज केलंय… ती मला किंवा मी तिला सोडण्याचं! अरे हो! घेतली औषध सगळी! व्यवस्थित येईन रे!…” त्या लेकाशी बोलत होत्या आणि माझं मन त्यांच्या विचारात गुंतलेलं! लेकाशी बोलून झाल्यावर त्या लहान मुलाच्या उत्सुकतेने बाहेरचा पाऊस, भिजणाऱ्या इमारती, भिजून स्वच्छ झालेला रस्ता न्याहाळात बसल्या. “पावसाच्या पडद्याआड किती छान दिसतं हे नेहमीचंच जग! अगदी स्वच्छ धुतल्यागत! पावसाचा झिरमिरता पडदा पांघरलाय नं?” थोडं माझ्याशी थोडं स्वतःशी त्या बोलत होत्या. “ पूर्वी खूपदा यायचे इथे पण नंतर आजारपणामुळे बंदच झालं येणं!”त्यांच्या चेहऱ्यावर एक उदासीचा काळोखा ढग सरकून गेला. ड्रायव्हर स्वतःच्याच तंद्रित टॅक्सी चालवतोय. तुम जो मिल गये हो… तो ये लगता है… की जहाँ मिल गया…! टॅक्सीच्या रेडिओवर गाणं लागलंय “मला उधाणता समुद्र खूप आवडतो. तुला?” त्यांनी विचारलं आणि मला उधाणता सागर आठवला. तो तर माझा सखा. किती गुपितं सांगितलीत मी त्याला, तो उधाणतो… हळुवार होतो… शांतवणाऱ्या लाटानी स्पर्शत राहतो. कधी गर्द हिरवा निळा… ऍक्वामरीन… कधी धसमुसळता मतकट… फेनफुलांचा साज मिरवणारा! समुद्र मला आवडतो? ओ व्हॉट अ क्वेशन?? मी न बोलता माझं उत्तर कळलं असावं त्यांना. “बघ… मला वाटलंच! तू येशील का भिजायला लाटेत गेट वे ला?” मला माझ्या ठरलेल्या भेटीची आठवण झाली. “नको. मला जरा जायचंय… कामं आहेत नं?” माझा नकार देण्याचा दुबळा प्रयत्न. “तुला सांगू? जिंदगी न रुकती है किसी के लिये… ये वो लम्हा है जो इसी वक्त जिया जाता है!!” आजींच्या गालावरची खळी आणखी गडद झाली. टुबी और नॉट टुबी… माझं मन तळ्यात मळ्यात करतंय. “मी तुला एक गोष्ट सांगते… आला क्षण मनापासून जग… शेवटच्या श्वासाला मनात काही राहता कामा नये… माझ्यासारखचं!
मी शेवटच्या टप्प्यावर आहे जिंदगीच्या! पण प्रत्येक क्षण तितक्याच उत्कटतेने जगतेय… जगणार आहे!” टॅक्सीची काच खाली करत, पावसाचे थेंब चेहऱ्यावर झेलत त्या म्हणाल्या. ओ गॉड! आयुष्यातल्या शेवटच्या टप्प्यावर? काय बोलत आहेत या? “आजी… आर यू ओके?” भावना भरास आल्या की इंग्रजी का उमटत तोंडातून? “अगं मी मस्त आहे. कॅन्सर नावाचा पाहुणा बसलाय ठाण मांडून शरीरात. त्याची आणि माझी रेस चाललीय. तो जिंकेलही कदाचित पण मी हरणार नाहीये! मला हरवण्याचं सुख त्याला मिळू द्यायचं नाही असं ठाम ठरवलंय नं मी!!” मी नव्या नजरेने त्यांच्याकडे बघतेय. काय जिद्द आहे? जिंदगी का हर लम्हा जी ले तू जरा… थोडा और सुकून है इंतजार में जरा!! मी नकळत त्यांचा हात हातात घेते. मऊसूत हातावरच्या सुरकुत्या जाणवतात. त्या स्पर्शात जुन्या रेशमाचा तलमपणा जाणावतो. त्या हळुवारपणे माझा हात दाबतात… घट्ट धरून ठेवतात. त्यांच्या डोळ्यांत मला पावसाआडच रेशमी ऊन डोकावताना दिसतं. माझ्याकडे बघून त्या हसतात तेव्हा उधाणत्या सागराच्या तुषारांमध्ये भिजल्यागत वाटून गेलं मला.
समोर गेट वे ऑफ इंडियाची भव्य वास्तू पावसात भिजतेय. मागच्या पार्श्वभूमीवर धूसर पडद्याआडचा सागर उधाणतोय. प्रचंड मोठी लाट भिंतीवर आपटते आणि लाखो तुषारांचे मोठी उधळले जातात. “आजी, चला भिजूया!” मी छत्री न उघडता टॅक्सीतून उतरते. पावसाचे थेंब अंगावर झेलत टॅक्सीचे भाडे देताना टॅक्सी ड्रायव्हर आम्हा दोघींकडे ‘काय वेड्या आहेत ‘ या नजरेने बघत मान हलवतो. आजीचा हात धरून मी समुद्राच्या दिशेने चालतेय. आजीच्या नितळ सुरकुतल्या त्वचेवर पावसाचे थेंब अलवारपणे बरसताहेत. त्यांच्या रूपेरी केसात अडकलेले पाऊसमणी हिऱ्यागत लखलखत आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेल्या गुलमोहराच्या शेवटच्या पाकळ्यांचा रस्ताभर सडा पडलाय आणि माझ्या सखीच्या डोळ्यांत इंद्रधनू उमटलंय! जिंदगी तुझे यूं जिते जाते है… की तनहाई में भी तुझको गले लगाये जाते है!!