वंदना, बरं झालं, लौकर आलीस… आता स्वयंपाक सांभाळ, मी जरा ध्यान… म्हणजे प्रार्थना करायला बसते. मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस.’ अशा सूचना आमच्या वंदनाला देऊन, मी माझ्या खोलीत गेले. आज जरा ध्यानधारणा करण्याचा मूड होता. श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत मी श्वसनाचे व्यायाम सुरू केले. आणि तेवढ्यात स्वयंपाकघरात काही तरी पडल्याचा आवाज झाला. आपसूकच मी ओरडून विचारलं, ‘अग वंदना, काय पाडलंस ग बाई? जरा धसमुसळेपणा कमी कर’ ही सूचना देऊन मी पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. डोळे हळुवार मिटले आणि त्याचवेळी आठवण झाली की, गॅसवर दूध तापायला ठेवलं आहे.
‘वंदना, अगं लक्ष दे. दूध ऊतू जाऊ देऊ नकोस.’
परत शांत बसण्याचा, मन एकवटण्याचा प्रयत्न केला. ओहो…! हे फ्रीज आज साफ करायलाच लागेल. काल भाजी सांडली होती. पुन्हा… ‘वंदना, अग तुझं काम आटोपल्यावर थोडं फ्रीज साफ करून जा बाई आणि हे बघ संध्याकाळी पाहुणे येणार आहेत. साबुदाण्याची खिचडी करणार आहे. तेव्हा दाण्याचा कूट कर… आणि हो, दाणे भाजताना गॅस मंद ठेव. गेल्यावेळी अगदी काळेकुट्ट केले होतेस… आणि ओटा आवरून जा. दाण्याची साल इकडे तिकडे पसरवू देऊ नकोस… आणि…’
आता मात्र वंदनाचा संयम सुटला. मला म्हणाली, ‘मावशी, तुम्हीच मला सांगितलं होतं की, मला डिस्टर्ब करू नका म्हणून. मी एक अक्षरही बोलले नाही पण तुम्हीच किती बोलत आहात मघापासून… जरा शांतीत प्रार्थना
करा ना.’
‘तू नको मला शहाणपणा शिकवूस कशी प्रार्थना करायची ते.’ असं तिला दाटून मी पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. पण, ते काही जमलं नाही. कितीतरी विचार मनात थैमान घालत होते. संध्याकाळी पाहुणे येणार, त्याची तयारी… रेकॉर्डिंगची काही कामं… सामाजिक बांधिलकीचे काही प्रकल्प… समुपदेशनाची काही सत्र… किती तरी दिवसांपासून पेंडिंग असलेली डॉक्टरांकडची व्हिजिट… मुलीच्या नवीन घरासाठी पैशाची जमवाजमव… नातवाच्या अभ्यासाची चिंता… नवऱ्यानं वॉकला जावं म्हणून माझा अट्टाहास, एव्हढंच नाही, तर पुढे दोन दिवस उन्हाचा तडाखा वाढणार म्हणून काय खबरदारी घ्यावी, याबद्दलचे विचार… त्यातील काही बेत सुरळीत पार पडतात, तर काही फिस्कटतात आणि ते का फिस्कटले म्हणून आधीच्याच चिंतेत आणखी पडलेली भर…
माझा ध्यान धारणेचा कार्यक्रम पार कोलमडून पडला. मग पुन्हा सुरू झाली चिडचिड. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे.
‘माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे. मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात, झाडांचं भिजणं सुंदर आहे… जगणं सुंदर आहे.’
मनाच्या संवेदना हळुवारपणे जागे करणारे हे शब्द. पण हे शब्द मी जगते का? मनापासून अनुभवू शकते का? कधी मन उत्तेजित होऊन चौखुर हुंदडत किंवा चिंतेने सैरभैर होतं. त्या त्या क्षणाचा आनंद लुटू देत नाही… तो क्षण जगू देत नाही.
समुपदेशनाच्या एका सत्रात, एका पालकाबरोबर बातचीत झाली. त्यातील आई सांगत होती की, त्यांचे शेजारी त्यांच्या मुलांसाठी नेहमीच अन्-ब्रेकेबल खेळणी आणतात. ती टिकून राहावीत म्हणून. त्या बाईंनाही ते पटलं आणि आपल्या मुलांसाठी तशीच खेळणी आणायला त्या गेल्या. पण, त्यांच्या मिस्टरांनी त्यांना थांबवलं आणि कुठलीही चांगली खेळणी घेण्याचा आग्रह केला. मुलांना त्या खेळण्याचा, ती तुटली तरी ते स्वीकारण्याचा आनंद मिळू दे, असं त्यांचं म्हणणं पडलं.
एक इटालियन व्हायोलिन संग्राहक, लुईजी तारीसिओ जेव्हा मरण पावला, त्यावेळी त्याच्या घरातून, त्याने आयुष्यभर गोळा केलेली २४६ व्हायोलिन्स सापडली. त्यातील काही व्हायोलिन्स अत्यंत दुर्मिळ आणि एकमेवाद्वितीय अशी होती. ही व्हायोलिन्स जर कुणा वादकाच्या हाती पडली असती, तर त्यातून कदाचित अनेक सुंदर सांगीतिक रचना श्रोत्यांच्या कानांना तृप्त करून गेल्या असत्या, अजरामर झाल्या असत्या. पण, लुइजीनं हा अमूल्य ठेवा आपल्या ताब्यात बंदिस्त ठेवला.
आपल्या आयुष्यातही असे अमूल्य सुंदर क्षण खरं तर रोजच येत असतात. काय करतो बरं आपण त्या क्षणांचं? ते अनुभवायचे सोडून, ‘नंतर बघू’ या विचारानं मनाच्या एका कोपऱ्यात साठवतो का? दोन दिवसांनी वाढणाऱ्या गर्मीची काळजी मला आताच घामाघूम करते? माझ्या जवळच्या ९९ सुवर्णमुद्रामध्ये मी आनंदी आहे? का त्या शंभराव्या मोहोरेसाठी मी तळमळत आहे?
पुन्हा कविवर्य पाडगावकर… त्यांच्याच कवितेनुसार…
‘सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा! काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा!
मृदुला घोडके