श्रीनिवास बेलसरे
मोहन सहगल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवर’चे (१९६६) एक वैशिष्ट्य होते. या सिनेमात विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांनी त्यांच्या आयुष्यातली एकमेव नकारात्मक भूमिका केली होती. सिनेमात त्याकाळचे एकापेक्षा एक यशस्वी कलाकार होतेच. धर्मेंद्र, शर्मिला या लोकप्रिय जोडीबरोबर शशिकला जवळकर, दुर्गा खोटे, धुमाळ, सुलोचना लाटकर, तरुण बोस, डी. जे. सप्रू, बेला बोस असे सितारे एकत्र आले होते.
‘देवर’ची कथा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारविजेते बंगाली लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी पद्मभूषण ताराशंकर बंडोपाध्याय यांच्या ‘ना’ नावाच्या लघुकथेवर आधारलेली होती. बंगालीत ‘देवर’ याच नावाने हा सिनेमा १९५४ला येऊन गेला होता. याच कथेवर तमिळमध्येही एक सिनेमा १९६२ला आला होता. कथा होती बालपणीच्या प्रेमिकांचा दुर्दैवाने दुसऱ्याच व्यक्तीशी झालेला विवाह!
सिनेमाची जवळजवळ सर्वच गाणी लोकप्रिय झाली. रोशनच्या संगीत दिग्दर्शनात मुकेशने गायलेले ‘बहारोने मेरा चमन लुटकर…’ आणि ‘आया हैं मुझे फिर याद वो जालीम गुजरा जमाना बचपनका…’ ही दोन्ही गाणी कमालीची हिट ठरली. ‘आया हैं मुझे फिर याद…’ तर एक कायमचे कुणालाही नॉस्टॅल्जियात घेऊन जाणारे गाणे आहे. सर्वच पिढ्यांना त्यात आपला भूतकाळ दिसतो. त्यातल्या रम्य आठवणी अस्वस्थ करतात, आनंदही देतात. प्रत्येकाला या गाण्यामुळे स्वत:च्या लहानपणातली निरागसता, यौवनातली मस्ती पुन्हा एकदा अनुभवता येते. त्यामुळे जाणत्या रसिकांना ही गाणी आजही अतिशय प्रिय आहेत.
असेच लतादीदींनी गायलेले ‘दुनियामें ऐसा कहाँ सबका नसीब है…’ अनेकांना एकाचवेळी हुरहूर लावून जायचे आणि दिलासाही द्यायचे! आनंद बक्षींचे शब्द, रोशनचे संगीत आणि लतादीदींचा आवाज म्हटल्यावर गाणे हिट होण्याला पर्याय नव्हता!
लतादीदींच्या या गाण्याचे स्वरूप सिनेमाचे ‘थीम’साँग असेच होते. प्रेम ही केवळ नशिबानेच मिळणारी गोष्ट आहे, अशी त्या काळी समाजातील बहुतेकांची समजूत होती आणि तेच त्या काळचे वास्तवही होते! तारुण्यसुलभ भावनांमुळे कुणी तरी खूप आवडले होते, हवेहवेसे वाटत होते, मात्र धीटपणाच्या अभावामुळे पुढाकार कुणी घ्यायचा हे ठरलेच नाही! नुसती उभयपक्षी ओढ असूनही ती शेवटपर्यंत अव्यक्तच राहून गेली. जीवलगाच्या साध्या दर्शनानेही मनात उलघाल होत राहिली. मात्र प्रेमाची कबुली दिलीच नाही. कधीमधी भेट झाली तरी सगळे शिष्टाचार पाळता-पाळता, इतरांना काय वाटेल हा विचार करता-करता इतरच विषय बोलले गेले. मनातल्या भावना, अपेक्षा मनातच सुकून गेल्या. प्रेमाच्या अभिव्यक्तीला अक्षम्य उशीर होत गेला आणि जनरितीप्रमाणे जी किंवा जो आयुष्याचा सोबती म्हणून हवा होता तो दुसऱ्याच कुणाच्या तरी आयुष्याचा भाग बनून गेला. हेच व्हायचे आणि मग नुसत्या आठवणी आणि मनातल्या मनात ओघळून सुकून जाणारी असावे. त्यामुळे आनंद बक्षींचे या गाण्याचे काहीसे हुरहूर लावणारे शब्द अपयशी प्रेमिकांना केवढा तरी दिलासा देत असत –
‘दुनियामें ऐसा कहाँ सबका नसीब है,
कोई कोई अपने पियाके करीब है…’
ज्यांच्या नशिबात प्रेम नसते त्यांना तारुण्यातील आयुष्याचा अथांग सागर एकट्यानेच पार करावा लागतो. कितीही प्रयत्न केले तरी त्यांना किनाऱ्यापर्यंत पोहोचता येत नाही. कारण प्रेमात फक्त दोघेच आवश्यक नसतात. तिथे तिसऱ्या एखाद्या सुहृदाची गरज असते. जिथे परस्परांना आवडणारे दोन जीव थेट भेटू शकत नाहीत, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, तिथे मध्यस्थाची भूमिका किती महत्त्वाची असते ते असे प्रेमिकच जाणोत. भावनेच्या एकतर्फी सागरात नुसत्याच तरंगणा-या प्रेमिकांच्या नावेला समुद्र पार करून देण्यासाठी नावाड्याची तटस्थ भूमिका पार पाडणारा कुणी तिसरा मित्र-मैत्रीण लागतेच.
ज्यांना दुर्दैवाने असा जीवलग मित्र किंवा मैत्रीण नसते त्यांना आयुष्यभर काही तरी फार महत्त्वाचे गमावल्याची रुखरुख सांभाळतच जगावे लागते हे वेदनादायक सत्य आनंद बक्षीनी तीन ओळीत मांडले होते-
‘दूरही रहते हैं उनसे किनारे,
जिनको ना कोई माँझी पार उतारे,
साथ है माँझी तो किनारा भी करीब है…’
तरीही प्रेम जर उत्कट असेल तर मात्र ते सगळ्या अडथळ्यावर मात करते. जरी सगळ्या आशा मंदावल्या, अवघे भावविश्व अंधारून आले, तरी प्रीती जागोजागी तारकांचे पुंज सजवून जीवनाचा रस्ता प्रकाशमान करून टाकते. मात्र त्याकरिता कुणा एकासाठी अगदी आतुर होणाऱ्या वेड्या प्रीतीची गरज असते. कुणासाठी तरी सगळे सोडून झोकून देणाऱ्या कलंदर मनाची गरज असते. ते जर असेल तर मात्र अशा प्रेमकहाणीची तऱ्हाच काही वेगळी असते –
‘चाहे बुझा दे कोई दीपक सारे,
प्रीत बिछाती जाए राहोंमें तारें.
प्रीत दीवानीकी कहानी भी अजीब है…’
अशात जर नशीब फिरले आणि दोघात दुरावा निर्माण झाला, तर दोघांना कशातही आनंद वाटत नाही. केवळ त्याच व्यक्तीच्या प्रेमासाठी आसुसलेल्या अस्वस्थ मनाला कशानेच चैन पडत नाही. कवी म्हणतो जर ती प्रिया जवळ असली तरच जगण्यात जिवंतपणा येऊ शकतो –
‘बरखाकी रुत हो, या दिन हो बहारके,
लगते हैं सुने सुने, बिन तेरे प्यारके…
तू है तो जिंदगीको जिंदगी नसीब है…’
जेव्हा कसेही करून जिंकायचेच अशी लालसा नसायची. समाजाच्या, जवळच्यांच्या मताला किंमत देऊन आयुष्यातल्या अनेक गोष्टींवर पाणी सोडले जायचे. हरण्याला आणि जिंकण्यालाही सारखेच महत्त्व होते. भावना, नाती, सफल होवोत की विफल ठरोत ती आयुष्यभरासाठी असत आणि आयुष्यभर निभावली जात त्या जमान्यातल्या या गोष्टी!