कर्जत (वार्ताहर) : माथेरान, एरव्ही थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून नावाजले जात असले तरी माथेरानच्या या लाल मातीत प्रामाणिकपणा ही मिसळलेला आहे याची प्रचिती आली. अलीकडच्या काळात समाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला असल्याचे अनेकवेळा दिसत असले, तरीही एखाद्याला सापडलेली तब्बल दहा हजारांची रोख रक्कम प्रामाणिकपणे संबंधित मूळ मालकाला परत करण्याची घटना माथेरानमध्ये नुकतीच समोर आली आहे.
त्यामुळे प्रामाणिकता, नैतिकता, माणुसकी व सामाजिक बांधिलकी शिल्लक असल्याची ही पोचपावतीच आहे.याचीच प्रचिती माथेरान येथील नगरपरिषदेच्या दैनंदिन सफाई कामगार कमल राजू गायकवाड यांनी दिली. याबाबत माथेरानला, रोज घरोघरी जाऊन सुका व ओला कचरा संकलन करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी कमल गायकवाड यांना संकलीत झालेल्या कचऱ्यात दहा हजारांची रोख रक्कम सापडली.
त्या रक्कमेचा मूळ मालक कोण, याची शहानिशा करून खात्री पटल्यावर ती संपूर्ण रोख रक्कम कोणतीही अभिलाषा न बाळगता संबंधित मूळ व्यक्तीस परत केली. त्यांच्या या निस्वार्थीपणाचे व प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रामाणिकपणाची दखल माथेरान शिवसेना महिला आघाडीने तत्काळ घेऊन, कमळ गायकवाड, प्रामाणिक महिला सफाई दूताचा साडी व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला.