कल्याण (प्रतिनिधी) : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली, कल्याण पश्चिम परिसरातील झोझवाला संकुल येथे प्रतिमाह रुपये २०० इतक्या अल्प दरात अभ्यासिका केंद्राची सुविधा महापालिकेमार्फत दि. ११ एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर प्रकाश परांजपे स्पर्धापरीक्षा अभ्यासिका केंद्र आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील आणि अभ्यासिकेसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंतच प्रवेश घेता येईल. अभ्यासिकेत सलग १५ दिवस गैरहजर राहिल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
अभ्यासिका हेही विद्येचे मंदिर असल्यामुळे विदयार्थ्यांनी अभ्यासिकेत व अभ्यासिकेच्या आवारात शिस्त व शांतता पाळणे गरजेचे असणार आहे. या अभ्यासिकेत इंटरनेटची सुविधा तसेच स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील.