Wednesday, January 15, 2025

‘तो’…

डॉ. पल्लवी परुळेकर- बनसोडे

एक पाय, एका हाताची मालकी
करी साऱ्या देहाची पालखी…’

सारं शरीर कसं नीट पण त्या इवल्याशा देहाला ज्याची गरज ते लावायला देव विसरला आणि जे लावलं त्याला विलग करायचं राहून गेलं. बाकी नाकीडोळी सरसं… पण त्याच्या दोन हातांपैकी एका हाताला बोटंच नव्हती. तर दुसऱ्या हाताची बोटं नखांशिवाय अर्धवट पण एकमेकांना चिकटलेली, एक पाय वाढायचा राहून गेला आणि दुसरा बिन बोटाचं नुसतं मांस. इतकं विचित्र थुटकं त्याचं रूप पाहून कळवळून आलं. अस्वस्थ झालं…

हाजीअली येथील भौतिक चिकित्सा हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी तीन महिने राहण्याचा योग आला तेव्हा कृत्रिम अवयवांचं महत्त्व जवळून पाहिलं. त्यातलाच हा एक ‘निखिल’… नावाप्रमाणेच निखळ, लाघवी. सावळा रंग पण त्याला खुलून दिसणारा. त्याचं हसणं तर चेहऱ्यावर नांदणारं… साऱ्या हॉस्पिटलभर फिरायचा.सर्वांचा होऊन जायचा. जराही आपल्या व्यंगत्वाचं ओझं न बाळगता हातात चेंडू घेऊन हवा तसा भिरकवायचा. एकदा आमच्या रूममध्ये चेंडू फिरला आणि तो मिस्कीलपणे आत शिरून चेंडू शोधू लागला. माझ्या मुलाजवळ आला. “हाय! काय करतोयस? चल खेळू, म्हणाला. एका क्षणार्धात मैत्री झाली आणि मीही सवयीने त्याची रोज वाट पाहू लागले. त्याची ऑपरेशनची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतसं त्याचं येणं कमी झालं. मलाही एकटं वाटू लागलं.उगाचच हुरहूर लागून रहायची.कोण कुठला पण जीव गुंतला त्याच्यात..

दोनच थुटक्या बोटांनी पेन हातात घेऊन सहज रेघ ओढावी आणि त्याचं चित्र व्हावं इतक्या सहजतेने तो स्वतः प्रेझेंट व्हायचा. त्याचं लाघवीपण मनाला मोहवून टाकायचं. खूप काही शिकवून तो जायचा. आयुष्याचं चॅलेंजच जणू त्याने स्वीकारलेलं. कोणताही बाऊ न करता सहज तो वावरायचा, सगळ्यांत मिसळायचा. ऑपरेशन करून त्याची बोटं विलग करता येतील या आनंदात सारं कुटुंब, एक हात, एक पाय चांगला यातच समाधान मानणारे सारे, त्याला काय-काय करता येईल याचा पाढाच सारे वाचायचे.

मी मात्र स्वतःच्या देहावर नजर टाकायचे. दोन्ही हातपाय धडधाकट असताना मी मनाचं अपंगत्व कुरवाळत बसायचे. खरंतर याचा त्यावेळी खूप राग यायचा, पण मुलाचं operation critical असल्यामुळे आणि कुणाचाच आधार नसल्यामुळे खूपच दमछाक व्हायची. शारीरिक आणि मानसिकही. पण निखिल मला आयुष्याचं थुटकेपण शिकवून गेला… त्याने खऱ्या अर्थाने मला जगणं किती सुलभ होऊ शकतं हे दाखवून दिलं.

मीही मग मनाच्या कुबड्या बाजूला टाकून सक्षमतेने त्या परिस्थितीला सामोरे गेले. पण आज निखिलची खूप आठवण येते. तशी प्रत्येक अडचणींच्या वेळी मी त्याला आठवते, मग मला माझ्या दुःखाचं ओझं वाटत नाही. काल मला तो खूप वर्षांनी भेटला. तितक्याच सहजतेने जितक्या सहजतेने तो तेव्हा चेंडू शोधायला आत शिरला होता. आता बऱ्यापैकी मोठा झालाय, कृत्रिम पायाच्या जोरावर आणि विलग झालेल्या बोटांनिशी..

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -