पोलादपूर (वार्ताहर) : शहरातील पार्टेकोंड ते सावंतकोंड दरम्यानचा एक लोखंडी पूल चार दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची तक्रार नगरपंचायत पोलादपूरकडून पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्रीच्या अंधारात काही अज्ञात व्यक्तींनी याच पुलाच्या ठिकाणी या पुलाचे अवशेष आणून टाकले आहेत. रविवारी ही बातमी पोलादपूर शहरात सर्वत्र पसरल्यानंतर हा विजय विरोधी नगरसेवकांचा की पोलादपूर पोलीसांच्या मध्यस्थीचा अशी चर्चा जोर धरू लागली. तसेच आरोपीला अटक करण्याऐवजी मुद्देमाल छिन्नविछिन्न स्वरूपात घटनास्थळी पुन्हा हजर झाल्याने आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई होण्याऐवजी त्याचा बचाव करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, याठिकाणी भेट दिल्यानंतर पोलादपूर शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल भुवड यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पोलादपूर ग्रामपंचायतीने पार्टेकोंड-सावंतकोंड भागातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना पायी तसेच दुचाकीवरून शहराशी संपर्कात राहण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत साधारणपणे ५०-६० फूट लांबीचा आणि ६ फूट रूंदीचा एक लोखंडी पूल बांधून घेतला होता. यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर या पार्टेकोंड सावंतकोंड भागात रस्ता करण्यात आल्याने या लोखंडी पुलावरील रहदारी बंद झाली. गेल्या काही वर्षांपासून वापराविना असलेल्या या लोखंडी पुलाकडे रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या स्थानिक लोकांचे लक्ष असे. सोमवारी सायंकाळी पोलादपूर नगरपंचायतीचा लोकप्रतिनिधी याठिकाणी येऊन पाहणी करून गेला आणि रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक ओळखीचे वाहन येऊन गेले.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी हा लोखंडी पूल नटबोल्ट कापून चोरीला गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले. याबाबत पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी गटनेता दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्नील भुवड आणि ऍड.सचिन गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी आणून दिल्यानंतर या चोरीस गेलेल्या लोखंडी पुलासंदर्भात माहिती घेतल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने हा पूल बांधल्यानंतर नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर हा पूल नगरपंचायतीकडे वर्ग केल्याचे समजून आले. त्यामुळे पोलादपूर नगरपंचायतीच्या विरोधी गटनेते दिलीप भागवत यांच्या लेटरपॅडवरून मुख्याधिकारी पोलादपूर नगरपंचायत यांना सदर लोखंडी पुलाच्या चोरीसंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
‘चोराला पोलीसांचा वरदहस्त’
यावेळी काँग्रेस पोलादपूर शहर अध्यक्ष अमोल भुवड यांनी, पोलादपूर पोलीस ठाण्याला या चोरीप्रकरणी कोणते वाहन होते, कोण कोण सहभागी होते, याबाबत सर्वच माहिती काँग्रेसच्या नगरसेवकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात जबाबावेळी दिली असताना पोलीसांकडून चोराला झालेल्या सहकार्यामुळे ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे हुकूमशाही आहे अथवा अन्य कोणती शाही आहे, हे तपासले पाहिजे. या सर्व प्रकारात पोलीसांचा वरदहस्त आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. एकूणच प्रकरणात आरोपीला अटक न झाल्यास तसेच सदरचे प्रकरण कायद्याच्या कक्षेत येऊन सुध्दा रफादफा झाल्यास उपोषण व आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्यात येईल, असा इशारा दिला.