Saturday, May 24, 2025

महामुंबईठाणे

‘त्या’ कोरोना कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन

‘त्या’ कोरोना कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या कामगारांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. चौथ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानुसार सुमारे ७०९ कामगारांचे आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, शहर स्वच्छता आदींसह इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली; परंतु पुढील दोन महिन्यांसाठीच त्यांचे हे पुनर्वसन करण्यात आल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.


कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत महापालिकेच्या विविध कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर काही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. तथापि, आता कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने इतर कामगारांना पुढील सहा महिने वाढवून द्यावेत, अशी मागणी करत माजी महापौर नरेश म्हस्के व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला होकार देत पालिकेनेही आता या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु काम न करता पगार कसा देणार असा प्रश्न पालिकेला पडला होता.


त्यामुळे आता सुमारे ७०९ कामगारांना महापालिकेच्या इतर विभागांत स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वॉर्ड बॉय, आया व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या आनुषगांने घेण्यात आलेल्या कंत्राटी स्वरूपातील कामगारांना पुढील सहा महिन्यांसाठी ठेवावे, अशी मागणी झाली होती. त्यानुसार आता यातील १२५ कामगारांना शहर स्वच्छेतेच्या मोहीमेत उतरवण्यात आले आहे. काही कामगारांना स्मशानभूमी, आरोग्य केंद्र व इतर ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली; परंतु पुढील दोन महिन्यांसाठी या कामगारांचे पुनर्वसन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment