सातारा (प्रतिनिधी) : या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला आहे. २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज याने पटकावत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पृथ्वीराज पाटील (वय-२०) विरुद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यामध्ये शनिवारी अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला व ४५वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. याअगोदर पृथ्वीराजने पुणे शहराच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुणफरकाने मात केली होती.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.