डॉ. विजया वाड
विशाखाला ‘योजना’ या शब्दाचं कुठलं भांडवल केलं की ती जाम खूश होते हे विसूला जॉब मिळण्याअगोदर ठाऊक होतं. त्याचा प्रिय मित्र राहुल यानेच ती खबर दिली होती.
“मॅमकडे कसली तरी ‘योजना’ घेऊन जा. जाम खूश होईल बघ.” मॅमकडे एकेरी उल्लेख कसा करणार? त्यांच्या अपरोक्ष बिनधास्त एकेरी! एकेरीच! मजा मज्जा! जाम मनोरंजन व्हायचं! राहुल विसूला खबर देऊन गेला.
मुलाखती आधी.
“योजनाबद्ध नियोजन हे माझ्या आयुष्याचं सूत्र आहे.” मॅम विसूच्या पहिल्याच वाक्यानं खूश झाली.
“योजनाबद्ध नियोजन? प्लीज एक्सप्लेन!”
“योजना इन सीटिंग! योजना इन वर्किंग! योजना इन फायलिंग! योजना इन एक्सिक्युटिंग!”
“वा! वा वा! वावावा!” विसूजी मी जाम खूश आहे.”
“मॅम, योजना हे माझ्या आयुष्याचं सूत्र आहे. योजनाबद्ध सुरुवात केली की आयुष्याचं सोनं होतं!”
मॅमचे सूर्यफुलासारखे मुख अधिकच खुलले-फुलले. “योजना हा माझा आयुष्यातील महत्त्वाचा शब्द आहे. योजनेशिवाय जीवन व्यर्थ आहे.”
“योजना योजने: योजन: प्रथमा
योजनं योजने: योजन: द्वितीया.”
“योजनेशिवाय माझं पानही हालत नाही.” विसू ठामपणे.
“मग आपली जोडी जमली म्हणून समजा.”
“मॅम, कसली जोडी? मी समजलो नाही.” विसू नम्रपणे वदला.
“मॅमला योजनाबद्ध जीवनक्रम आवडतो.”
“असं होय!” निरागसपणाचा आव आणत विसू म्हणाला.
“मी अशा पार्टनरच्या शोधात आहे, ज्याला माझ्यापेक्षा योजना महत्त्वाची वाटते.”
“काय आहे तुमची योजना? मला ऐकवता का? मी जाम खूश आहे तुमच्यावर.” सुंदरी चमकली. विसूला प्रमोद झाला. प्रमुदित होऊन तो म्हणाला, “स्वत:ची कंपनी सुरू करावयाची योजना आहे माझी. त्यासाठी आधी सात वर्षे नोकरी. मग योजनाबद्ध लाँच. योजनाबद्ध विकास आणि योजनेनुरूप स्वतंत्रता. बस!”
“मी अगदी अशाच जोडीदाराच्या शोधात होते.”
“म्हणजे?”
“मला लग्नाचा जोडीदार हवाय. नोकरीतला पार्टनर नकोय.”
“ठीक आहे.” विसू म्हणाला. त्याला कुठे नऊ ते पाच रोज रोज खर्डेघाशी करायची होती हो!
“मग काय आहे तुमची? योजना!”
“या. समजावतो.” त्याने बाजूला घेतले विशाखाला. मुलाखतीसाठी आलेले अन्य उमेदवार जळले. जळ जळ जळले.
जलकर उनकी राखुंडी हो गयी. पण करे तो भी क्या? जरुरतमंद थे ना सारे? मुकाट्याने लायनीत बसले.
“मी योजना केली आहे.”
“योजनाबद्ध बचत करायची.”
“ती कशी?”
“योजनाबद्ध बजेट. किती खर्च? किती सेव्हिंग? किती मौज? अन् योजनाबद्ध प्रवास? काय नि कुठे वाचवायचे? कसा नि किती खर्च करावा? सारे योजनांतर्गत.”
“योजनेश्वर, हा जॉब तर मिळालाच. पण तुम्हाला पसंत असेल तर वधू म्हणून माझीही तयारी आहे.”
“मी योजना करतो जागेची.”
“माझी जागा आहे ना!” विशाखा मोकळेपणी म्हणाली.
आणि जॉब नि शुभमंगल एकाच वेळी झाले.
योजनाबद्ध योजनेश्वर सैलावले. पण बायको सोडून जाईलशी भीती होती! मित्र (अनुभवी) म्हणाले,
“हे बघ, गरोदरपणी बायका अडकतात. जमते का बघ!”
योजनेश्वर कामाला लागले.
आणि लवकरच प्रयत्न फळाला आले.
उलट्या, चकरा, सारेच सुरू झाले. ती गाल फुगवून म्हणाली,
“लग्न झाल्यावर मजला पाच वर्षे मूल नको होते.”
“पण योजना फसली! आपण गर्भपात करूया?”
“अरे नको.”
“का?”
“मूल होणे ही भाग्याची गोष्ट आहे.”
“योजनाबद्ध? लग्नात बसणारी?”
“लग्नानंतर आलेलं गरोदरपण? कौतुकच कौतुक ना?”
“मग योजनाबद्ध बाळंतपण करूया?” योजनेचा बोजवारा
उडाला होता.