Friday, January 17, 2025
Homeराजकीयकोकण विकासाचा ध्यास हाच नारायण राणे यांचा श्वास

कोकण विकासाचा ध्यास हाच नारायण राणे यांचा श्वास

लोकप्रिय नेता, कोकणचा बुलंद आवाज आणि कोकण विकासासाठी तळमळीने झटणारा नेता म्हणून ओळख असलेले नारायण तातू राणे अर्थात एनटीआर अशी ज्यांची ओळख आहे, त्यांचा येत्या १० एप्रिलला वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांचा कोकणच्या जनतेशी असलेला संपर्क, कोकण विकासाबाबत त्यांना वाटणारा जिव्हाळा आणि कोकणातील औद्योगिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीबाबत त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून किंवा महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून आणि विविध पदांवर काम करताना जे कार्य केले, जो विकास केला तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याला विसरता येणार नाही. मास लीडर अशी ओळख असलेल्या नारायणराव राणे यांच्या या जीवनपटातील काही आठवणींना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उजाळा देण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे.

माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे १९८५-८६ सालचा तो काळ असावा. ज्यावेळी नारायण राणे हे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नारायणराव राणे त्यावेळी महानगरपालिकेवर निवडून आले होते, असे मला आता आठवते आहे. कारण या गोष्टीलाही आता जवळपास ३७ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. त्यावेळी नारायण राणे हे नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर ते आमाच्यासाठी कुतूहल होते. कारण नुकतीच १९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली होती. काँग्रेसची मुंबई महानगरपालिकेवरील सत्ता उलथवून शिवसेना त्यावेळी महानगरपालिकेवर सत्तेमध्ये आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राची अस्मिता जनतेसमोर मांडली होती आणि त्यामुळेच या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला होता, हिंदुत्वाचा झेंडा फडकला होता. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोकणातील अनेक नेते या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर रत्नागिरीतील क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरी येथे आलेल्या नारायणराव राणे यांचं व्यक्तिमत्त्व मी जवळून पाहिलं होतं आणि ते माझ्या पूर्ण लक्षात हे होते.

१९९० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणात शिवसेनेच्या अनेक नेत्यांना निवडणूक लढविण्यासाठी पाठवलं होतं. राम जन्मभूमीचा विषय त्यावेळी संपूर्ण देशात गाजत होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार म्हणून प्रमोदजी महाजन तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात अतिशय चांगले वातावरण निर्माण केले होते. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीचे अनेक आमदार राज्यभरात निवडून आले होते. मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून नारायण राणे हे विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिकेत काम करत असताना, नगरसेवक म्हणून काम करीत असताना नारायण राणे यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष पदही अतिशय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळले. त्यामुळे मराठी अस्मिता जपताना अनेकांना अनेक ठिकाणी नोकरीची संधी मिळाली. त्यातून कोकणातील अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, रोजगार मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे सुरक्षाकवच होते, जी टीम होती त्यामध्ये नारायणराव राणे हे अव्वल स्थानी होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत काही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईतील मराठी अस्मिता हिंदुत्व जपण्यासाठी त्यावेळी भाजपतर्फे संघातर्फे आणि शिवसेनेतर्फे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले. त्यामुळेच मराठी अस्मिता जपणे शक्य झाले.

त्यानंतर १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या रूपाने शिवशाहीचे सरकार खऱ्या अर्थाने स्थानापन्न झाले. मनोहर जोशी हे युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या दृष्टीने नारायण राणे यांना किती महत्त्व होते हे दिसून आले. पिता आणि पुत्र यांच्या पलीकडचं नारायण राणे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं नातं होतं हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे ज्या विश्वासाने त्या मंत्रिमंडळात नारायणराव राणे यांच्याकडे महसूल खाते असेल किंवा अन्य काही खाती सोपवली असतील, त्या खात्यांना विकासासाठी नारायणराव राणे यांनी तळमळीने न्याय देण्याचा प्रयत्न केला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावेळी नारायणराव राणे यांनी मंत्रीपदाचा उपयोग करत रत्नागिरीतील मच्छीमारांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी विविध योजना अमलात आणल्या. तसेच कोकण विकासाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आणि तो राबविण्याचे आटोकाट प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले. रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघावर मला त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्त केले आणि मच्छीमारांच्या विकासाच्या अनेक योजना त्यानंतर सक्षमतेने राबविण्यात आल्या. नारायण राणे यांचा त्यावेळी एक वेगळाच झंझावात असायचा. कशेडीपासून सिंधुदुर्गपर्यंत त्यांच्या कामाचा करिश्मा सातत्याने दिसून येतो.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली. अवघ्या सहा महिन्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायणराव राणे यांनी कोकणसह राज्याच्या विकासाला मोठी गती देण्याचा, विकास साधण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यानंतर १९९९ ला लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र झाल्या. त्यावेळी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती होती आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत मलाही भाजपचा युतीचा उमेदवार म्हणून रत्नागिरीतून उमेदवारी मिळाली होती. माझा या निवडणुकीत विजय झाला होता. त्यावेळी माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नारायणराव राणे यांना मी विनंती केली होती. युतीचे मुख्यमंत्री म्हणून नारायणराव राणे यांनी माझ्या प्रचारासाठी रत्नागिरीत यावे, अशी त्यांना मी कळकळीची विनंती केली होती आणि कोणताही दुजाभाव न ठेवता नारायणराव राणे यांनी युतीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराला रत्नागिरीत येण्याचं मान्य केलं. ते हेलिकॉप्टरने प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रत्नागिरीत आले आणि त्यांनी युतीचे उमेदवार म्हणून बाळ माने यांना विजयी करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर माझा विजयही झाला होता. त्यानंतर निवडणुका झाल्यावर विरोधी पक्षनेते म्हणून नारायणराव राणे यांनी १९९९ ते २००४ पर्यंत अत्यंत कार्यक्षमतेने काम केलं. सरकार नसलं तरी विरोधी पक्षात विरोधी पक्ष म्हणून कसं काम करायचं, जनतेच्या मागण्या कशा मान्य करून घ्यायचा, याचं कसब विरोधी पक्षनेते म्हणून नारायणराव राणे आणि गोपीनाथराव मुंडे या दोघांनी त्यावेळी दाखवून दिलं आणि जनतेची अनेक कामे मार्गी लावली.

शिवसेनेतील काही वादांमुळे नारायणराव राणे यांना २००५ मध्ये शिवसेना सोडावी लागली. खरं तर ज्या शिवसेनेसाठी, शिवसेनाप्रमुख यांच्यासाठी त्यांनी तळमळीने आणि प्रामाणिकपणे शिवसेनेत कार्य केलं ते आज शिवसेनेत नाहीत. शिवसेनेतील पुढील पिढीकडून नारायण राणे यांना योग्य ती वागणूक मिळाली नाही आणि त्याचं दुःख नारायणराव राणे यांना त्यावेळी होते आणि आजही आहे; परंतु त्यात फारसे जाण्याची गरज नाही. त्यानंतर नारायणराव राणे यांनी कधी मागे वळून न पाहता आपलं पुढील काम आणि आपला दबदबा, करिष्मा आजही कायम ठेवला आहे. नारायणराव राणे यांच्या या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नी नीलमताई यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या खंबीरपणे त्यांच्या नेहमी पाठीशी राहिल्या. त्यानंतर शिवसेनेतून फारकत घेतलेल्या नारायणराव राणे यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्याला भाजपने आपल्या पक्षात सामावून घेतलं आणि हा कोकणचा नेता भारतीय जनता पक्षाच्या कोंदणात कोहिनूर हिरा म्हणून प्रस्थापित झाला. नारायणराव राणे यांचे कार्य, क्षमता पाहूनच त्यांना केंद्रातील मोदी मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री हे मानाचे पद मिळाले आहे आणि या पदालाही ते चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सिंधुदुर्गात नव्याने झालेले मेडिकल कॉलेज असेल, इंजिनीअरिंग कॉलेज असेल आणि चिपी विमानतळ जे सुरू झालं, त्याबाबतीतही नारायणराव राणे यांचे प्रयत्न सर्वाधिक मोलाचे आणि महत्त्वाचे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा जो विकास आज दिसतो आहे, त्यामागेही नारायण राणे यांचे कर्तृत्व आहे. नारायण राणे यांनी केलेले पर्यटनवाढीचे प्रयत्न यामुळेच सिंधुदुर्ग आज पर्यटनाच्या बाबतीत गोव्याच्याही पुढे जाण्याच्या बेतात आहे. नारायणराव राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हेसुद्धा देवगड मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कामाची कार्यपद्धती पाहिली असता सुरुवातीच्या काळात ज्याप्रमाणे नारायणराव राणे हे कार्यरत होते, अगदी त्याच पद्धतीने नितेश राणे ही आज कार्यरत दिसतात. थोडक्यात नितेश राणे हे नारायणराव यांची राजकारणातील कार्बन कॉपी असल्याचे सर्वांना वाटते. निलेशजी राणे यांनीही खासदार म्हणून आपली एक चांगली प्रतिमा कोकणात, राज्यात आणि देशात उमटवली आहे. तसेच नारायणराव राणे यांच्या पत्नी नीलमताई यांनीही विविध बचत गट, महिला बचत गटांच्या रूपाने किंवा अन्य संस्थांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी ताकद निर्माण केली. कोकणच्या विकासासाठी झटणाऱ्या नारायणराव राणे यांना चांगले आरोग्य मिळावे आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्याचा रूपाने तळागाळात शतप्रतिशत पोहोचावी, याच त्यांना या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे खास सदिच्छा.

– बाळ माने माजी आमदार, भाजप

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -