नारायण राणे यांच्यात ‘कुछ तो हटके’ बात आहे. त्यांनी स्वतःचे विशिष्ट वलय निर्माण केले आहे, ज्यामुळे ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात.ते नेहमी देण्यासाठी तत्परतेने आतुर, म्हणूनच हा एक आगळा-वेगळा राजकारणी. आज ते केंद्रात कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. थोड्याशा अडथळ्यानंतर राणे यांनी पुनःश्च गती साधली आहे. हे कौतुकपात्र आहे.
- अरुण बेतकेकर, माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना
राजकारणात नारायण राणे यांच्यासारखा दिलदार, शिवसेना आणि बाळासाहेबांसाठी जीव ओवाळून टाकण्यास सज्ज असा नेता विरळ अन् दुर्मीळच. बाळासाहेबांना आपले दैवत मानणारा शिवसैनिक कालांतराने राज्याचा मुख्यमंत्री झाला.
नारायण राणे, फेब्रुवारी १९९९ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी राणेंविषयी सांगितलेली एक आठवण. बाळासाहेबांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आम्ही नेते मंडळी रात्री-अपरात्री बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्री गाठत असू. मातोश्रीभोवती सुरक्षेसाठी शिवसैनिक असत. त्यात एक मुत्सद्दी चेहरा सातत्याने लक्ष वेधून घेई. एके रात्री तो शेकोटीच्या बाजूला उभा दिसला. कुतूहलाने मी त्यास विचारले, “थंडी वाजते का? नाही हो, येथे मच्छर इतके आहेत की, एका जागेवर थांबणेही कठीण होते.” मी त्यास त्याचे नाव विचारले, उत्तर आले नारायण राणे, शिवसेना चेंबूर शाखा.” बाळासाहेबांना आपले दैवत मानत, सर्वस्व निःस्वार्थाने अर्पण करण्यास सज्ज हाच शिवसैनिक कालांतराने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला.
अशीच आणखी एक आठवण, जून १९९६ साली मी स्वतः महासंघातील माझे सहकारी विलास पोतनीस व गोविंद परब, बाळासाहेबांच्या सोबत होतो. त्यावेळी महसूल मंत्री सुधीरभाऊ जोशी यांना अपघात झाला होता. त्यांच्या पश्चात महसूल खाते नारायण राणे पाहत होते. याविषयी चर्चेत बाळासाहेब म्हणाले, “येथे सुसंस्कृतपेक्षा ‘माझा टपोरी’ नारायण राणे परवडला, जो स्वतःपेक्षा शिवसेनेस व मला सर्वस्वी मानतो, काळजीही घेतो.” ‘माझा टपोरी’ हा शब्द उच्चारताना बाळासाहेबांच्या मनातील, राणे यांच्याविषयी आपुलकी, अभिमान ओसंडून वाहताना मी पाहिला. राणे विदेशात जात अशा प्रत्येक वेळी बाळासाहेब व त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना साजेल अशा उंची भेटवस्तू आवर्जून आणत. हे राणे नव्हे, तर स्वतः बाळासाहेबांनी आपल्या मनगटावरील घड्याळ दाखवत मला सांगितले होते.
शिवसेनेत बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांचा निकटवर्तीय व त्यांच्या आतल्या गोटातील म्हणून मी अनुभवलेली एक घटना सांगतो. जानेवारी १९९९ साली मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. बाळासाहेबांना रिक्त मुख्यमंत्रीपदासाठी नारायण राणे यांची वर्णी लावण्यास जरासाही विलंब लागला नाही. राणे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कालावधी सात-आठ महिनेच राहिला. बाळासाहेबांनी पुढची पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहाल, असा शब्द काही अटी-शर्तींसह राणे यांना देत निवडणूक त्यानुसारच लढण्याचे संकेत दिले. निवडणुकीस अद्यापही ४५ दिवस होते. रंगशारदा येथे निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर सर्व जिल्हाप्रमुखांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर येण्यास सांगितले. वैयक्तिक मलाही बोलावले गेले. त्याच दिवशी राणे यांनी आपला स्वतःचा जो काही खजिना आहे तो निवडणुकीत शिवसेनेच्या विजयासाठी खुला केला. हे होताना पाहून मी राणे यांना म्हणालो, “एवढ्यात कशासाठी, निवडणुकीचे वारे सुरू होईपर्यंत थांबू.” राणे म्हणाले, “जे काही आहे ते शिवसेना व बाळासाहेब यांचे. खजिना रिता करून सोडू.” राजकारणात नारायण राणे यांच्यासारखा दिलदार, शिवसेना आणि बाळासाहेबांसाठी जीव ओवाळून टाकण्यास सज्ज असा नेता विरळ अन् दुर्मीळच.
सत्तांतरानंतर ऑक्टोबर १९९९ साली राणे विरोधी पक्षनेते झाले. त्यांचे वास्तव्य मंत्रालयासमोरील बी-३ बंगल्यात असे. एकेदिवशी तेथील ट्रॅफिक सिग्नलवर मी माझ्या स्कूटरवर थांबलो होतो. राणे यांच्या गाड्यांचा ताफा यू-टर्न घेऊन बंगल्याच्या दिशेने जात होता. एका गाडीची काच उघडली ते राणे होते. हातवारे करत त्यांनी मला बंगल्यावर येण्यास सांगितले. थोडे बोलणे झाल्यावर म्हणाले, “तू स्थानीय लोकाधिकार महासंघाचा सरचिटणीस तरीही स्कूटरवर फिरतो. शिवसेनेत साधा शाखाप्रमुखही गाडी-घोडे उडवतो.” मी म्हणालो, “मला इतकेच परवडते.” ते ताबडतोब म्हणाले, “तुमचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर हे मंत्री झाले, आमदार आहेत, त्यांनी तुला नाही तरी महासंघाला एक गाडी देऊ केली नाही का? मीच त्यांना बघून घेतो. सध्या माझ्याकडील एखादी गाडी घेऊन जा. सोबत तुझ्यासाठी एक-दोन सुरक्षारक्षकही देतो.” मी म्हणालो, “आहे त्यात मी सुखी आहे. हे सगळं सांभाळणे मला शक्य होणार नाही.” त्यांनी हट्ट केला, नंतर पाहू म्हणत मी विषयास बगल दिली.
फेब्रुवारी १९९९ साली मुख्यमंत्री झाल्या-झाल्या त्यांनी मला आपुलकीने बोलावून घेतले. चर्चेदरम्यान त्यांनीच विषय काढला, “शिवसेनेची सत्ता आल्यावर आपण काय-काय मिळविले.” मी म्हणालो, “काही नाही, साधे एसईओ पदही नाही.” मला वेड्यात काढत त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यकांना बोलावून आदेश दिला, “माझ्या १०% कोट्यातून चांगली व प्रशस्त सदनिका कोठे उपलब्ध आहेत.” त्यांनी काही जागा सुचविल्या. त्यातील पवई येथील हिरानंदानी कॉम्प्लेक्समधील १००० चौरस फूट जागा मला देण्याची सूचना करत यांच्याबरोबर बसून २-३ दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याचे आदेश दिले. मी त्यांच्याबरोबर बसलो, त्यांनी मला त्यासंदर्भात कागदपत्र व निकषांची माहिती दिली. मी त्यातील उत्पन्न व काही निकषांपलीकडे होतो, ते म्हणाले, “यातून मार्ग काढणे सहज शक्य आहे.” हे मला मनस्वी पटले नाही. सहज मिळू शकणारे १००० चौरस फुटांचे निवास मी नाकारले. हे येथे नमूद करण्याचा उद्देश असा, माझ्या ३५-४० वर्षांतील राजकारणात, स्वतःसाठी ओरबाडून खाणारे हव्यासी नेते अनुभवले, नारायण राणे मात्र यास अपवाद. ते नेहमी देण्यासाठी तत्परतेने आतुर, म्हणूनच हा एक आगळा – वेगळा राजकारणी.
नारायण राणे यांच्यात ‘कुछ तो हटके’ बात आहे. त्यांनी स्वतःचे विशिष्ट वलय निर्माण केले आहे, ज्यामुळे ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. उद्भवलेल्या परििस्थतीनुरूप राणे यांना पक्षांतर करावे लागले. जुलै २००५ साली शिवसेना सोडावी लागल्यानंतर सर्वच पक्षांत त्यांना आपल्याकडे घेण्याची चढाओढ लागली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फसवणूक व गळचेपी होते याची जाणीव झाल्याने व त्यांच्यातील मूळ हिंदुत्वाची अवहेलना होत असल्याची प्रचिती येताच, चांगले भवितव्य असूनही त्यांनी काँग्रेसचा त्याग करत हिंदुत्ववादी भाजपास कवटाळले. आज ते केंद्रात कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. थोड्याशा अडथळ्यानंतर राणे यांनी पुनःश्च गती साधली आहे. हे कौतुकपात्र आहे. दादा आपणाकडून अजून बरेच चांगले घडायचे आहे. आपण शतायुषी व्हा!