मुंबई : आत्मनिर्भर भारतासाठी एमएसएमई गतिमान करणार, असा निर्धार केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री (एमएसएमई) नारायण राणे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
उद्योग मंत्रालयात अनेक विभाग, खाती आहेत. त्यामुळे आमच्या मंत्रालयाला बजेटमध्ये चांगली तरतूद केलेली असते. कोरोना काळात बंद पडलेल्या उद्योगधंद्यांना पुनर्जिवित करणे. कारखाने पुन्हा सुरू करणे आणि नवीन उद्योगधंदे आणणे हे काम अतिशय चांगल्याप्रकारे झाले. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी पाच लाख कोटी रुपयांचे अनुदान उद्योगमंत्रालयाला दिलेत. त्यातील साडेतीन ते चार लाख कोटी गेल्या वर्षी शिल्लक होते. आता आता भर टाकण्यात आली आहे. कर्जबाजारी उद्योजकांसाठी, कोरोनामुळे मार्केट मिळू न शकलेल्यांसाठी दोन लाख कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेत. त्याशिवाय काही योजनांतर्गत २० हजार कोटी म्हणजेच जवळपास आठ लाख कोटी उद्योग मंत्रालयाला मिळाले आहेत. आमच्या मंत्रालयाला निधीची कमतरता नाही. म्हणून देशात उद्योजक निर्माण करणे, आजारी उद्योगधंद्यांना सक्षम करणे, उत्पादन वाढवणे, रोजगार निर्माण करणे, एक्स्पोर्ट वाढवणे. जीडीपीमध्ये एमएसएमईने भरीव वाटा उचलावा, यासाठी मी आणि मंत्रालय प्रयत्नशील आहे. एमएसएमईतर्फे आम्ही सिंधुदुर्गात तीन दिवसीय रोजगार परिषद घेतली. त्यानंतर जम्मू, वाराणसी, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी रोजगार मेळावे, परिषदा घेतल्या. आमच्या मंत्रालयाचा जीडीपीमध्ये ३० टक्के वाटा आहे. हा वाटा वाढवण्यासाठी आम्ही अनेक योजना राबवत आहोत. पंतप्रधान मोदी यांचे उद्योग मंत्रालयावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल वेगाने आहे. उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देशाचे उत्पन्न वाढू शकते. निर्यात वाढू शकते. तसेच आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी हे मंत्रालय महत्त्वपूर्ण ठरेल, असे वाटल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या उद्योग मंत्रालयाकडे लक्ष ठेऊन आहेत, असे राणे यांनी पुढे म्हटले.
केंद्रीय मंत्रीपद मिळेल, असा ठाम विश्वास होता
गेल्या वर्षीच्या वाढदिवशी मी खासदार होतो. आता केंद्रीयमंत्री आहे. याच वर्षी केंद्रीयमंत्री होईन, असे वाटले नव्हते. मात्र, एक दिवस केंद्रात मंत्री होईन, असा ठाम विश्वास होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवताना लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असे महत्त्वाचे खाते दिले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवभारताचे बलस्थान असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दै. प्रहारला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. भाजप म्हणजे सर्वांची ध्येय-धोरणे पुढे घेऊन जाणारा पक्ष असेही राणे पुढे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाबाबत विचारले असता, नारायण राणे म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना विचारपूर्वक गेलो. आज देशात सर्वात मोठा पक्ष कोणता? दीर्घकाळ आपली ध्येय धोरणे घेऊन पुढे जाणारा पक्ष कोणता? कर्तृत्ववान माणसे कोणत्या पक्षात आहेत? याचा मी अभ्यास केला. त्यातच हिंदुत्ववादी विचारांचा असल्यामुळे भाजपमध्ये जायचा विचार केला. सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपमध्ये प्रवेश केला. देशाचा विकास म्हणा किंवा सर्वसामान्य आणि गरिबांबद्दल त्यांच्या मनात असलेली भावना यामुळे आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे उत्कृष्टपणे देशाचा कारभार चालवत आहेत. हे मी जवळून पाहतो. त्यामुळे मोदी यांच्याबद्दल माझ्या मनात सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाहजी कर्तृत्ववान व्यक्ती असून देशातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत. दुसऱ्या बाजूला पक्षाची बांधणी चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यामुळे देशात प्रत्येक दिवसागणिक पक्ष वाढतोय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुकांमध्ये मिळालेले घवघवीत यश. याचे श्रेय मोदीजींसह गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जाते. या आघाडीच्या नेत्यांनी चांगल्याप्रकारे पक्ष सांभाळल्यामुळे मोठा विजय मिळाला, असे माझे प्रामाणिक मत आहे.
बेस्टचे चेअरमनपद, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि आता केंद्रीयमंत्री अशी पद अनेक पदे आपण भूषवलेली आहेत. त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक जबाबदारीमध्ये, पदामध्ये फरक आहे. मुंबईच्या जनतेला चांगल्या वातावरणात जगण्यासाठीच्या सोयीसुविधा पुरवणे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणे, या दृष्टिकोनातून काम सुरू होते. त्यामध्ये मी स्वत: एक नगरसेवक आणि शेवटची तीन वर्षे बेस्ट समितीचा चेअरमन म्हणून मी खूप शिकलो. बेस्टचे अध्यक्षपद सांभाळताना मी खूप काही शिकलो. मला यश मिळतोय. प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतोय, याचे श्रेय महानगरपालिकेतील माझ्या कामाला देतो. नगरसेवक आणि बेस्ट समितीचा चेअरमन असतानाच १९९०मधील विधानसभा निवडणुकीसाठी माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणातून (मालवण) तिकीट दिले. त्यावेळी माझ्याजवळ केवळ २८ दिवस होते. इतक्या कमी कालावधीत स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे निवडणूक जिंकली आणि मी आमदार झालो. आमदार म्हणून अतिशय यशस्वी काम केले. त्याच कामामुळे राज्यातील कानाकोपऱ्यात मला जनतेकडून खूप प्रेम मिळत होते. त्यामुळे माझ्या कामाचा उत्साह वाढत होता. याच कामगिरीच्या जोरावर माझ्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आले. त्यामुळे नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष, आमदार, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता म्हणजेच विधानसभा अध्यक्षपद सोडले तर मी राज्यातील प्रत्येक पद भूषवल्याचा मला सार्थ अभिमान आहे. याचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जाते.
शिवसेनेच्या अंतर्गत मतभेदांमुळे मला पक्ष सोडावा लागला. मला काढून टाकण्यात आले नाही. मी पक्ष सोडला. २००५मध्ये मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी मला अतिशय सन्मानपूर्वक वागवले. काँग्रेसने मला महसूलमंत्रीपद दिले. तुम्हाला एक वर्षाच्या आत मुख्यमंत्री बनवणार, असे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले होते. मी १२ वर्षे वाट पाहिली. तिथला एकंदरीत कारभार, काही नेत्यांची चुकीची कार्यपद्धती पाहिल्यावर मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. हिंदुत्ववादी असल्याने तसेच तशी विचारसरणी असल्याने मी भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झालो. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला विचारणा केल्यानंतर मी होकार दिला. भाजपमध्ये आल्यानंतर काही दिवसांनी मला खासदारकी मिळाली. खासदार म्हणून कार्यरत असताना ७ जुलै २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री केले. मोदी यांच्यासह अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे. त्यांनी माझा आदर केला. यथोचित मानसन्मान केला. आताही चांगला मानसन्मान मिळतोय, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी संगितले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष चांगली कामगिरी करत आहे. मात्र, राज्याला सक्षम मुख्यमंत्री नाही. विद्यमान मुख्यमंत्री हे मंत्रालय, कॅबिनेट तसेच कुठल्याही कार्यक्रमात दिसत नाहीत. जनतेचे कुठलेच प्रश्न, मग ते शेतकऱ्यांचे असो, मजुरांचे असो किंवा सोडवले जात नाहीत. कुठल्याही प्रश्नाकडे, समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही. तसेच त्यांचा त्याबाबत अभ्यासही नाही. केवळ सुडाचे राजकारण करायचे. विरोधकांच्या मागे लागायचे. कुचेष्टा करायची, या पलीकडे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी काहीही करत नाहीत. यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प पाहा. एकदम बोगस… राजकोषीय तूट केवढी आहे. ही तूट कशी भरून काढणार, हे सांगितलेले नाही. विकास करण्यासाठी पैसा कुठाय? काय विकास होतोय? शिवसेनेकडे अनेक वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे. पण देशाच्या आर्थिक राजधानीची काय अवस्था करून ठेवली आहे? लोकप्रतिनिधी आणि सत्तारूढ शिवसेना यांनी काय केले आहे? जे करतात ते अधिकारी करतात. आयुक्त म्हणून इक्बाल सिंह चहल यांनी काय प्रभाव पाडलाय? महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी पालिकेला लुटले आहे. ज्या करदात्यांनी कष्टाच्या पैशांनी टॅक्स भरला. त्यांच्या पैशावर सत्ताधारी आपली घरे भरत आहेत. ही कसली नैतिकता? काय दिले मुंबईकरांना… जनतेची केवळ फसवणूक सुरू आहे. जागतिक कीर्तीच्या शहराची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही. राज्यातील उद्योगधंद्यांना बळकटी देण्यासह रोजगार वाढण्यादृष्टीने आम्ही (एमएसएमई) राज्य सरकारला अनेक पत्रे पाठवली. मात्र, एकाचेही उत्तर आलेले नाही. राज्याचे उद्योगमंत्री पत्रावाला चाळ प्रकरणात गुंतलेत. महाराष्ट्र अधोगतीकडे नेण्याचे काम शिवसेना करतेय.
सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्या नावावर कमवणे सुरू आहे. महाराजांना बदनाम करत आहेत. हे सरकार फार काळ टिकणार नाही. अडीच वर्षे सत्तेत काढली तरी पुढील अनेक वर्षे ईडी आणि सीबीआयच्या घेऱ्यात जातील.
ठाकरे सरकारला स्वप्नातही राणे कुटुंब दिसते. त्यामुळे मिळेल तेव्हा राणे कुटुंबांची बदनामी करणे आणि त्यांना अडचणीत आणणे, हा या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे, असेच चित्र पाहायला मिळते. त्याबाबत काय सांगाल, असे विचारले तेव्हा, कोण माझ्या मागे लागले, याची पर्वा नाही. मी त्यांना पुरून उरेन. माझा जन्म शिवसेनेत झाला आहे. बाळासाहेबांनी शिवसेना घडवली. ही शिवसेना घडायला त्यात नारायण राणेंचा मोठा वाटा आहे. संजय राऊतचा नाही. तो आयत्या बिळावर नागोबा आहे. तेव्हाचे शिवसैनिक आता कुठेच नाहीत. कार्यकर्त्यांना वेळ देत नाही आणि नेत्यांच्या करोडोंच्या संपत्ती उघड होत आहेत. डायरीत मातोश्रीची एंट्री काय? हे काय चालले आहे?
खासदार संजय राऊतांच्या ढोलाताशातील स्वागताचे मला आश्चर्य वाटले. त्याचा काय पराक्रम? तो काय क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकून आलाय का? ईडीने त्यांची बेनामी मालमत्ता जप्त केली. काळा पैसा बाहेर काढला. अशा माणसाचे भव्य-दिव्य स्वागत होते. काय म्हणावे या विचारसरणीला? शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करताहेत. शिवसेना कशी संपतेय, याची मजा राष्ट्रवादीवाले पाहतात. संजय राऊतांचा तोल गेला आहे. म्हणून ते असभ्य भाषा वापरत आहेत. आपली काळी कृत्ये बाहेर आली की यांना मराठी माणूस आणि महाराष्ट्र आठवतो.
नातेवाईकांवरील कारवायांनंतर मुख्यमंत्री संतापले. पण त्यात काय चूक? पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांनी कोर्टात दाद मागावी. ही प्रॉपर्टी कुठल्या पैशांतून घेतली? हे पैसे या उद्योगातील आहेत, हे सिद्ध करावे. सध्याच्या राज्यातील कारवाया या एक टक्का आहेत. अजून ९९ टक्के बाकी आहेत.
महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे, व्याकुळ आहे. गुदमरतेय…
सत्तेची खुर्ची मोकळी करा आणि तुम्ही आराम करा.
सध्या त्याचीच गरज आहे
राज्यातील जनता तुमच्या कारभाराने गुदमरलीय,
त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.
तुम्ही आराम करा…
बाळासाहेब होते तोवर लोकांची, सर्वसामान्यांची शिवसेना होती. आता बट्याबोळ आहे. आता कोण पक्षप्रमुख आहे, हेच कळत नाही. उद्धव ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत की आदित्य ठाकरे? एकालाही जनतेच्या प्रश्नांची चाड नाही.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशांमुळे उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारमधील मंत्री सैरभैर झाले आहेत. प्रत्येक शिवसेना नेत्याची पोलखोल सुरू आहे. ही केवळ सुरुवात आहे. ठाकरे सरकार भोवतीचा फास आवळत चाललाय. कुठल्याही क्षणी जे काही होईल, त्यासमोर हे सरकार टिकणार नाही. सत्ता जाणार. तो क्षण अतिशय जवळ आलाय.
मराठा आरक्षणासह धनगर आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवला नाही. राज्याच्या हिताचा कुठलाच प्रश्न सोडवलेला नाही. आम्ही मराठा आरक्षण दिले होते. ते आरक्षण का टिकवू शकले नाहीत? त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचाच नाही. ते आरक्षण देऊच शकत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री तर मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत.
मुख्यमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय अधिवशेनातील भाषण ऐेकले आणि मला आश्चर्य वाटले. दोन-अडीच वर्षांतील काम, कोरोना काळातील परिस्थिती तसेच अर्थसंकल्पातील तरतुदींवर भाष्य करणे आवश्यक होते. मात्र, भावनिक आवाहन करत आणि टोमणे मारत मुख्यमंत्र्यांनी भाषण संपवले. विधिमंडळातील कामकाजाची त्यांना काहीही माहिती नाही.
किरीट सोमय्या यांच्या पाठीमागे राणे कुटुंबियांसह संपूर्ण भारतीय जनता पक्ष आहे. ते चांगले काम करत आहेत. एकटा किरीट शिवसेनेला भारी पडला. सर्वजण एकदम बाहेर पडले तर काय होईल, याचा विचार करा. तुमचे ५६ आमदार आहेत. आमचे १०५ आहेत. त्यामुळे काळाची पावले ओळखून वेळीच शहाणे व्हा.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…