मुंबई (प्रतिनिधी) : संडे स्पेशल लढतींच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी आहे. दोन्ही संघ तुलनेत तगडे असल्याने वानखेडे स्टेडियमवर एक चुरशीची लढत अपेक्षित आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊने सलग तीन सामने जिंकलेत. त्यांना विजयाचा चौकार लगावण्याची संधी आहे. चेन्नई सुपर किंग्जसह सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवत त्यांनी कमालीचे सातत्य राखले. मात्र, विजयाची हॅट्रिक साधणाऱ्या सुपर जायंट्सना अपयशी सलामीला सामोरे जावे लागले होते. गुजरात टायटन्सकडून त्यांना मात खावी लागली. मात्र, लखनऊच्या क्रिकेटपटूंना पराभवातून बोध घेतला.
सलामीवीर क्विंटन डी कॉकसह आघाडीच्या फळीतील दीपक हुडाने प्रत्येकी दोन हाफ सेंच्युरी मारताना फलंदाजी उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष बदोनीसह कर्णधार राहुल आणि इविन लेविसने प्रत्येकी एक अर्धशतक मारले तरी राहुल आणि लेविसकडून आणखी भरीव योगदान अपेक्षित आहे. मध्यमगती अवेश खानसह लेगस्पिनर रवी बिश्नोईने बॉलिंगचा भार वाहिला आहे. राजस्थान रॉयल्सची कामगिरी संमिश्र आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सला धूळ चारली. मात्र, बंगळूरुने त्यांचा विजयरथ रोखला.
आता संजू सॅमसन आणि सहकाऱ्यांसमोर विजयीपथावर परतण्याचे चॅलेंज आहे. राजस्थानकडून जोस बटलरने एका शतकासह एक अर्धशतक झळकावले तरी त्याला अन्य सहकाऱ्यांची अपेक्षित साथ मिळालेली नाही. कर्णधार सॅमसनने एकदा पन्नाशी पार केली तरी त्याच्यासह देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर आणि यशस्वी जैस्वालला अधिक चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने गोलंदाजीचा भार वाहिला तरी त्यांना अन्य सहकाऱ्यांची चांगली साथ अपेक्षित आहे.
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ : रा. ७.३० वा.