Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीमहागाईमुळे गृहिणींना मिरचीचा ठसका

महागाईमुळे गृहिणींना मिरचीचा ठसका

तरीही कर्जत, नेरळच्या बाजारात मसाल्याच्या पदार्थांसाठी गर्दी

नेरळ (वार्ताहर) : मुंबईपासून पुण्यापर्यंत पट्ट्यातील खवव्ये चांगले मसाले बनवून आपली रुचकर खाण्याची हौस भागवत असतात. कर्जत आणि नेरळच्या बाजारपेठेत मिळणारी मिरची विशेष आवडीची असल्याने या दोन्ही बाजारपेठांत मिळणारी मिरची उपलब्ध असलेली बाजारपेठ खुणावत त्यांना असते. हैद्राबादची स्पेशल मिरची मिळणारी एकमेव बाजारपेठ गृहिणींच्या गर्दीने फुलली आहे. महागाईच्या जमान्यात दुकाने कमी झाली असली तरी आवक मात्र तेवढीच आहे.

उन्हाळ्याला सुरुवात झाली की महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची साठवण करण्याचे. घरच्या सुगरण महिला मंडळीला लवकरात लवकर तिखट मसाला करण्याचे वेध लागले आहेत. जेवणातील महत्त्वाचा घटक भाजी आणि भाजीसाठी लागणारा मसाला महिला स्वत: जातीने लक्ष देऊन बनवून घेतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीसाठी कर्जतची बाजारपेठ ओळखली जाते. महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या कर्जतच्या बाजारपेठेत विकली जाणारी मिरची प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातून येते.

कर्जतच्या मिरची गल्लीत जेवणात तिखट मसाल्याचे विशेष आकर्षण असलेले खवय्ये प्रामुख्याने मिरची खरेदीसाठी येतात. बदलापूर, डोंबिवली, कल्याण, पनवेल, ठाणे, नवी मुंबई या भागांतील आगरी-कोळी लोक मच्छी-मटण या पदार्थांची लज्जत वाढवणारे मसाले बनवण्यासाठी कर्जतची बाजारपेठ वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या खरेदी करण्यासाठी जानेवारीपासून गर्दी करतात. मिरचीसोबत मसाल्याचे पदार्थ त्यात हळद, गरम मसाले यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते.

पूर्वी कर्जत बाजारपेठेत मिरची विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. त्या मानाने मिरचीची विक्री करणारी दुकाने कमी झाली आहेत. मात्र जी दुकाने आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. कर्जतच्या मिरची गल्लीत शंकेश्वरी, गंटूर, लवंगी, अंकुर, काश्मिरी, ढोबळी, तेलपरी, बेडगी या जातींची मिरची विक्रीसाठी येते. महागाई आणि किरकोळ वाढलेले भाव यांचा कोणताही परिणाम कर्जतच्या या प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेवर पडला नाही.

कारण चार महिन्यांच्या मिरची हंगामात तब्बल ५००-६०० पोते मिरचीची विक्री होते. कोकणातील मांसाहारी लोक प्रामुख्याने गंटूर आणि लवंगी या मिरचीला सर्वाधिक प्राधान्य देतात. कारण या दोन्ही प्रकारच्या मिरचींची चव तिखट असते. नेरळ या लहान बाजारपेठेतही काही दुकाने आजही मसाल्याचे पदार्थ आणि मिरची विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. नेरळच्या जुन्या बाजारपेठेत असलेली मिरची विक्रीची दुकानेसुद्धा खवय्यांनी मिरची खरेदीसाठी सजली आहेत.

ग्राहकांची पसंती असलेल्या मिरच्या

काश्मिरी, बेडगी, शंकेश्वरी, लवंगी, गंटुर, तेलपट्टी, ढोबळी, अंकुर या मिरच्या ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत.

कसा करतात मसाला?

खरेदी केलेल्या मिरचीची सुकलेली देठ काढून मिरची कडक उन्हात सुकवली जाते. त्यानंतर त्यात हळद, गरम मसाले यांचे योग्य मिश्रण करून या सर्व वस्तू मिरची कांडपमध्ये मसाला तयार करण्यासाठी नेल्या जातात. तेथे कांडप गिरणीत तयार झालेला मसाला गृहिणी या डबे भरून ठेवतात. हा मसाला वर्षभर टिकतो, तर बाजारात मिळणारे तिखट मसाल्याच्या पाकिटात केवळ मिरची पूड असते. त्यामुळे मिरची खरेदी करून मसाला करण्याची धडपड कांडप केंद्र शोधून मसाले तयार करण्यासाठी धडपड करीत असतात.

यंदा मिरची गेल्या वर्षीपेक्षा महाग झाली आहे हे खरे असले तरी तीन वर्षांपूर्वी असलेल्या दरापेक्षा यंदा दर थोडे कमी आहेत. मात्र महागाई, तसेच वाढते दर यांचा कोणताही परिणाम मिरची विक्रीवर झालेला दिसून येत नाही. कर्जतच्या बाजारपेठेत मिरचीच्या चवीची खात्री ग्राहकांना मिळत असल्याने आणि कोणताही गिऱ्हाईक तक्रार घेऊन येत नसल्याने दरवर्षी जुनी गिऱ्हाईक कायम राहून नवीन गिऱ्हाईक यांची भरच पडलेली दिसून येते. – जयंतीलाल जोहारमल परमार, मिरचीचे जुने विक्रेते

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -