मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शनिवारी दणदणीत विजय नोंदवत मुंबईला धूळ चारली. बंगळुरुने हा विजय सात गडी राखून मिळवला. या विजयानंतर बंगळुरु संघ गुणतालिकेत थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान संघ या विजयाच्या आनंदात असतानाच आता बंगळुरुचा खास गोलंदाज हर्षल पटेलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिणीचे निधन झाल्यामुळे हर्षल पटेलला सध्या आयपीएल सोडावा लागला आहे. हर्षल पटेल बायोबबलच्या बाहेर पडला आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार खेळाडू बायोबबलच्या बाहेर पडल्यानंतर त्याला तीन दिवस विलगीकरणात राहावे लागते. हर्षल पटेल सध्या घरी गेलेला असल्यामुळे तो परतल्यावर त्याला तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतरच तो संघात सामील होऊ शकेल. दरम्यान येत्या मंगळवारी म्हणजेच १२ एप्रिल रोजी बंगळुरुचा सामना चेन्नईशी होणार आहे.
मात्र नियमानुसार या सामन्यात हर्षल पटेल खेळू शकणार नाही. दरम्यान, बंगळुरुचा शनिवारी मुंबई इंडियन्सशी सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरुने मुंबईला धूळ चारली. मुंबईने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य बंगळुरुने सात गडी राखून गाठले. मुंबईचा हा सलग चौथा पराभव आहे.