आलू चिज रोल, पिकनिक बॉल्स, पापडाची भजी, दही पकोडा, ज्वारीच्या रव्याचा सांजा, साबुदाणा डाळ खिचडी… हे आणि यापेक्षाही अधिक असे कितीतरी नाश्त्याचे पदार्थ एकाच ठिकाणी कुठे मिळतील असे वाटत असेल, तर निवडक पाककृतीच्या एकाच पुस्तकात सामाविष्ट करण्यात आले आहेत. स्नॅक्स आणि स्टार्टरचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पेय या प्रकारामध्ये बेलफळाचे सरबत, कैरी-वाळ्याचे सरबत, औषधी सरबत, ताडगोळ्याची थंडाई, तलबिना अशा पेयांची देखील सरबत्ती याच पुस्तकात आपल्याला मिळते. यावरच या पदार्थांचा खमंगपणा संपत नाही, तर सूप, सलाड, चटणीचाही या पुस्तकामध्ये समावेश आहे. उसाच्या रसाचे सूप, शेवग्याच्या शेंगांचे सूप, सुरणाची कोशिंबीर, ओल्या हळदीचा सॉस, अळकुड्याचे पापड आदी कधी कधी न ऐकलेल्या पदार्थांच्या पाककृतीदेखील आपण घरबसल्या करून याचा स्वाद घेऊ शकतो.
महिलांना अनेकदा रोज तेच तेच पदार्थ करून करून कंटाळा येतो. कालनिर्णयच्या निवडक पाककृती या पुस्तकात अनेक पदार्थ बनवून आपण घरच्यांसाठी नवनवीन पदार्थांच्या पाककृती बनवू शकतो. आमटी-भाजी प्रकारातही रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न असतोच. घरातही ठरावीक डाळी आणून आठवड्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी खाद्याचा खमंग आस्वाद घेता येईल. नवरत्न करी, श्वेतांबरा आमटी, चकई करी, केळफुलाची करी तर भाजी प्रकारांमध्ये बटाट्याचे लोणचे, शाकाहारी खिमा, गुलमोहराची भाजी, उल्ली थियल, व्हेजिटेबल कुर्मा आदी पाककृती स्वत: करून आजमाऊ शकतो. भाताच्या प्रकारात बेक्ड राइस, मटारचा हिरवा भात, फणसाची बिर्याणी, पोहे, मोड आलेले मूग व बाजरीचा बिर्याणी पुलाव आदींचा समावेश करण्यात आला आहे.
उपवासाच्या पदार्थांत केळ्याची पानगी, साबुदाण्याचे काकडी घालून केलेले वडे, उपवासाची पाणीपुरी, उपवासाची फ्रँकी आदी पदार्थांचा स्वाद चाखता येईल. गोड पदार्थांत पुरणाचे पोहे, ओल्या हरभऱ्याचा शिरा, उडदाचे लाडू, अन्नपूर्णा लाडू, रव्याचे मोदक, ख्रिसमस पुडिंग, मावा डाळ रोल्स, ज्वारीच्या पिठाचा सॅडविच केक तर, इतर पदार्थांत केकसाठी तयार मिश्रण कसे तयार करावे, माठामध्ये शाकाहारी पाककृती बनविण्याची पद्धत, प्रवासी खीर, शक्तिमान आदी पदार्थ देखील कसे बनवावे याची कृती देण्यात आली आहे. या सर्व पदार्थांनंतर पाहिजे असतो तो मुखवासासाठी एखादा पदार्थ. जेवणानंतर अधिक करून सौपचा वापर केला जातो. पण याहीपेक्षा वेगळे नवीन असे पदार्थ अापणास येथे मिळतात. यामध्ये खासकरून मुखवास चिक्की, बोरकांडी, कवठाचा चाफा च्यवनप्राश, विड्याचा मसाला, मसाला सुपारी आदी मुखवासाच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. थोडक्यात पण अनेक पाककृतींचा समावेश या एका पुस्तकात करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यासाठी देण्यात आलेली सुयोग्य रेखाचित्रेही साजेशी वाटतात.
निवडक पाककृती
संपादक, प्रकाशक – जयराज साळगावकर
मूल्य – रुपये १५०/-