माधवी घारपुरे
केल्याने देशाटन पंडित मैत्री
सभेत संचार
काव्य शास्त्र विलोकन मनुजा,
चातुर्य घेतसे फार ।।
ही उक्ती जी सत्य तर आहेच, आपण पिढ्यान् पिढ्या ऐकतोय. पण त्याचबरोबर मानवी मनाच्या छटा… सोनेरी, रूपेरी, धवल, काळसर आणि काळी पाहायला मिळत असेल तर ती एकपात्री कलाकाराला, असे माझे ठाम मत बनले आहे. मग तो गायक, नर्तक, वक्ता, नकलाकार, कवी, कथाकथनकार कोणीही असो.
एक वक्ता आणि कथाकथनकार म्हणून माझ्या पोतडीत इतक्या विविध अनुभवांच्या पुरचुंड्या आहेत की, मागणी तसा पुरवठा करता येईल. कुठे लवकर गेल्यावर वक्त्याला न ओळखल्याने सतरंज्या घालायला लागल्या, तर कुठे ठरल्यापेक्षा कमी पैशांचे पाकीट हातात पडले तर कुठे रिकामेच पण असंख्य सुशोभित पाकीट मिळाले. कुठे ‘काही द्या’ म्हटल्यावर रुपये २५ पण हाती आले, तर कुठे जाण्या-येण्याचे मुंबई-सातारा भाडे ठरले. पण साताऱ्याहून मी सांगलीला गेल्यावर मुंबई, सातारा, सातारा-सांगली भाडे दिले. याचबरोबर बडदास्त ठेवून कार्यक्रमापूर्वीच मानधन देणारेही भेटले.
आज एका बेरकीपणाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. सांगलीच्या जवळ एक व्याख्यानमाला होती. मंडळाच्या प्रमुख होत्या द्वारकाबाई. ‘कार्यकर्ता कसा असावा?’ हा विषय द्वारकाबाईंनी मला सांगितला होता. बारावी पास असलेल्या त्या बाई. कार्यकर्त्यांचे सोनाराने कान टोचलेले बरे असतात, असे म्हणून मुद्दाम हा विषय घ्या म्हणाल्या. मी तशी तयारी करून महालक्ष्मीला आदल्या दिवशी बसले. सांगलीला आमचा माणूस न्यायला येईल, फोन करायचा असे ठरले. मी सकाळी ६ वाजता सांगलीत उतरल्यापासून फोन केला अर्धातास. पण काही पत्ता नाही. फोन बंदच. शेवटी त्या भागाची मला माहिती असल्याने मी साडेसातपर्यंत द्वारकाबाईंच्या घरी पोहोचले. मी आल्या आल्या त्या म्हणाल्या, ‘‘आलात पण! मानूस गेला की सांगलीला!’’
‘‘अहो, तुमचा फोनच लागत नाही अर्धातास! अशावेळी साधारणपणे तुमच्याकडून फोन येतात की, तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात? ते तर दूरच पण मला उत्तरही नाही.
चेहेऱ्यावर ओशाळेपण दाखवत म्हणाल्या, बंद पडला वाटतं. इतक्यात लेक मोबाइल घेऊन ली. आई, सतीशदादांचा फोन. अग्गोबाई मेला, आता सुरू झाला वाटतं! ये सतीश, ताई पोहोचल्या. (सांगलीला न गेलेल्या सतीशने विचारणा केली असावी बहुधा).
ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला पण तत्पूर्वी, जेवणावेळी द्वारकाबाई म्हणाल्या, दोन व्हाऊचर्सवर सह्या करा. एक सांगलीला गेलेल्या गाडीचं अन् दुसरं मानधनांचं! त्यांनी दोन व्हाऊचर्स कोरीच माझ्यासमोर ठेवली. मी म्हटलं, अहो, सांगलीला कोणी आलं नाही आणि रात्री मी सांगलीत जाऊन उद्या रात्री मुंबईला जाणार आणि दुसऱ्या व्हाऊचर्सवर नाव, तारीख, रक्कम काहीच नाही. मी नाव, तारीख ५०००/- टाकून सही केली. हे पाहिल्यावर द्वारकाबाईंचा चेहरा कसा लाल झला. कांही बोलल्या नाहीत पण कार्यक्रमाला जाण्यापूर्वी, मला चहापण मिळाला नाही.
कार्यक्रमांत कार्यकर्त्यांबाबत जे बोलायचे ते मी योग्य बोलले. मला खात्री आहे, कुठून हा विषय दिला, असे द्वारकाबाईंना झाले असावा. अशी एक नव्हे अनेक माणसे भेटली. या सर्वांच्या अनुभवाचा फायदा एक कलाकार म्हणून झाला. माझी दशा नाही झाली उलट मला एक दिशाच मिळाली. त्यामुळे यातल्या कोणत्याच माणसांवर राग नाही. आपण आपल्याला कसे उभे करायचे? स्वत:ला अती मोठे तर समजायचे नाहीच. पण आपली किंमतही कमी होऊ द्यायची नाही! खोट्या स्तुतीला बळी पडायचे नाही. नव्यांच्या तुलनेत फेस व्हॅल्यू कमी असेल पण गुणांची व्हॅल्यू कशी वाढवायची, हे शिकायला मिळाले. शेवटी आपलं जीवन आपल्यासाठी तर एक पुस्तक आहे. नुसतंच पाहिलं तर स्वप्न आहे आणि अनुभवलं तर ज्ञान आहे. नाही का?