नारायण राणे एक संवेदनशील, कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व आहे. कोणतीही गोष्ट जमत नाही, जमणार नाही असले शब्द त्यांच्या शब्दकोषात नाहीत. म्हणूनच कुणालाही प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीवर मात करत येणाऱ्या संकटावर पाय देऊन उभे राहण्याचा नुसता त्यांनी प्रयत्न केला नाही, तर नेहमी यश खेचून आणले.
परमेश्वराने काही व्यक्तिमत्त्व फार वेगळी बनवलेली असतात. त्यांच वागणं, बोलणं, त्यांची कर्तबगारी, कर्तव्य कठोरता असं सारच जगावेगळं असतं. राजकारणात, समाजकारणात असं वागून, बोलूनही त्यांच वेगळेपण तितकच टिकाऊ असतं. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे हे असच एक वेगळ्या धाटणीचे व्यक्तिमत्त्व आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. ना. नारायण राणे यांना १९८७ मध्ये प्रथम भेटलो. तिथपासून आजपर्यंत नारायण राणे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक, अभ्यासपूर्वकतेने जे बदल घडविले आहेत, ते पहाता कुणालाही अचंबित करायला लावणारे आहेत. चेंबूरचा शिवसेना शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधान परिषद सदस्य, राज्यसभा खासदार, आणि आता केंद्रीय मंत्री असा हा सारा प्रवास वाटतो तेवढा निश्चितच सहज, सोपा नव्हता आणि नाहीच!
नारायण राणे यांचा जन्म वरवडे (फळसेवाडी) ता. कणकवली येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आज जे ना. नारायण राणेंचं व्यक्तिमत्त्व उभं झालं आहे. त्यात विशेष म्हणजे राणे कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात ते जन्मले, वाढले मात्र ती परिस्थिती असेल त्यावर मात करून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने उभा रहाण्याचा त्यांचा स्वभावगुण आहे. नारायण राणे हे एक सहृदयी, संवेदनशील, कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व आहे. कोणतीही गोष्ट जमत नाही, जमणार नाही असले शब्द त्यांच्या शब्दकोषात नाहीत. म्हणूनच कुणालाही प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीवर मात करत येणाऱ्या संकटावर पाय देऊन उभे रहाण्याचा नुसता त्यांनी प्रयत्न केला नाही, तर नेहमी यश खेचून आणले.
राजकारणात यश-अपयशाचा खेळ नेहमीच चालतो. एखादा पराभवानंतर राजकारणातील अनेक नेते पुढे कुठे दिसत नाहीत; परंतु नारायण राणेंसारखा राजकीय नेता स्वत:भोवती राजकीय ‘वलय’ निर्माण करतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांच्याशिवाय चर्चाही होत नाही. प्रशासकीय कामकाज हाताळण्याची त्यांची अशी एक खास कार्यपद्धती आहे. म्हणूनच नगरसेवक ते केंद्रीय मंत्री या सर्व प्रवासात ज्या-ज्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली, त्या प्रत्येक वेळी, प्रत्येक विभागांत नारायण राणेंच्या कामाचा ठसा उमटविलेला दिसून येईल. प्रशासनावर जर ‘वचक’ नसेल, तर कामकाज कशा पद्धतीने हाताळले जाऊ शकते, प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांना कसे जुमानत नाहीत, याचे विदारक, वास्तव चित्र आज महाराष्ट्र अनुभवतोय. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार वगळता अन्य मंत्र्यांच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणाला जुमानत नसतात; परंतु नारायण राणे यांना चुकीची माहिती, चुकीचे उत्तर देऊन चालणार नाही. हे महाराष्ट्रातील मंत्रालयापासून दिल्लीतील मंत्रालयातही अधिकाऱ्यांना चांगलेच माहिती आहे. यामुळेच कोणतीही फाइल कधी पेंडिंग रहाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. इतका कामाचा त्यांचा उरक असतो.
आजवर अनेक विकासकामे कोकणात त्यांनी केली आहेत. कोकणात लाइफटाइम हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज त्यांनी निर्माण केलं. जर पैसे मिळविणे हा त्यांचा हेतू असता, तर हॉस्पिटल पुणे, मुंबईसारख्या शहरात उभं करण्यात आले असते; परंतु तसे त्यांनी केले नाही. ज्या कोकणात आरोग्याची पुरेशी सुविधा नाही त्या कोकणातील जनतेला दर्जेदार व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात हाच त्यामागचा उद्देश होता. आपल्या वडिलांना कोकणात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. हीच मनातील खंत असल्याने एका संवेदनशील, सहृदयी सामाजिक, राजकीय नेत्याने सुसज्ज हॉस्पिटल उभे केले हे नारायण राणे यांच्या राजकीय विरोधकांना कधीच समजले नाही आणि समजणारही नाही. राजकारण, समाजकारणात नारायण राणेंमधला सहृदयी माणूस असंख्य वेळा पहायला मिळाला. प्रसंग कोणताही असो, कुणाचेही आजारपण असो त्याच्या पाठीशी नारायण राणे उभे राहिले नाहीत असे घडलेच नाही. अनेकांच्या आयुष्यात त्यांनी आधारवडाची भूमिका निभावलीय; परंतु आजचा समाज बदललेला आहे. उपकाराची जाणीव नसलेल्यांची संख्या अधिक आहे. म्हणूनच माणुसकी हरवत चाललेल्या समाजाचं जागोजागी दर्शन घडतंय. सकाळी एखाद्याने उपकार केले, तर पुढच्या अर्ध्या तासात त्याचा विसर पडणारी माणसं असतील, तर त्यावर काय बोलायचे! मात्र समाज बदलला तरीही नारायण राणेंनी आपल्यातील परोपकारी वृत्ती बदलली नाही.
माणूसपण जपणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री देव रामेश्वराने त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावे हीच प्रार्थना…
संतोष वायंगणकर (लेखक दै. प्रहारच्या कोकण आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)