मुंबई (प्रतिनिधी) : सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांच्या धडाकेबाज वैयक्तीक अर्धशतकांमुळे दिल्लीने कोलकातासमोर २१५ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकातासमोर खलील अहमद, कुलदीप यादव यांनी प्रभावी गोलंदाजी करत दिल्लीला मोठा विजय मिळवून दिला. दिल्लीच्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरूवात अडखळत झाली. अवघ्या ३८ धावांवर त्यांचे दोन्ही सलामीवर माघारी परतले होते. कर्णधार अय्यर आणि नितेश राणा यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेतली.
दोघांनीही आक्रमक पवित्रा घेत संघाची धावसंख्या खेळती ठेवली. दोघेही चांगले सेट झालेले असताना नितेश राणाचा संयम सुटला. त्याने २० चेंडूंत ३० धावा केल्या. त्यानंतर अय्यरही फार काळ टिकला नाही. अय्यरने ३३ चेंडूंत ५४ धावा करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण अय्यर बाद झाल्यानंतर कोलकाताचा विजय मिळवणे कठीण होत गेले. आंद्रे रसलने २१ चेंडूंत २४ धावांचे योगदान दिले. पण संघाला विजय मिळवून देणे त्याला जमले नाही. शेवटी धावा आणि चेंडूंमधील फरक वाढत गेल्याने कोलकाताला विजय मिळवणे कठीण झाले. कोलकाताचा संपूर्ण संघ १७१ धावांवर सर्वबाद झाला. तत्पूर्वी दिल्लीने आपल्या डावाची सुरूवात दणक्यात केली.
पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर या दोन्ही सलामीवीरांनी दिल्लीला दणक्यात सुरुवात करून दिली. दोघांनीही वैयक्तिक अर्धशतक झळकावले. पृथ्वीने २९ चेंडूंत ५१ धावांचे योगदान दिले तर वॉर्नरने ४५ चेंडूंत ६५ धावा केल्या. कर्णधार पंतने १४ चेंडूंत २७ धावा केल्या. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर या तळातील फलंदाजांनी रविवारी प्रभावी कामगिरी केली. अक्षर पटेलने १४ चेंडूंत २२ धावा तडकावल्या तर शार्दुलने ११ चेंडूंत २९ धावांचे योगदान दिले.