Saturday, July 20, 2024
Homeक्रीडापराभव मुंबईची पाठ सोडेना

पराभव मुंबईची पाठ सोडेना

बंगळूरुकडूनही पराभव

पुणे (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामात पराभव मुंबई इंडियन्सची पाठ सोडायला तयार नाही. रविवारी पुण्यात झालेल्या सामन्यात माजी विजेत्यांना बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सकडून ७ विकेट आणि ९ चेंडू राखून मात खावी लागली. रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांचा हा सलग चौथा पराभव आहे. मुंबईचे १५२ धावांचे आव्हान बंगळूरुने ३ विकेटच्या बदल्यात १८.३ षटकांत पार केले. अनुज रावत हा बंगळूरुच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ४७ चेंडूंत ६६ धावांची चमकदार खेळी केली. अनुजच्या झटपट खेळीत २ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. अनुजने दमदार फॉर्म मिळवला. शिवाय कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहलीसह दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या. डु प्लेसिससह त्याने ८.१ षटकांत ५० धावांची सलामी दिली. त्यानंतर कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी ८० धावा जोडताना रॉयल चॅलेंजर्सला फ्रंटफुटवर नेले.

विराटनेही चांगली खेळी करताना ३६ चेंडूंत ४८ धावांची भर घातली. त्याच्या हाफसेंच्युरीमध्ये ५ चौकारांचा समावेश आहे. तत्पूर्वी, बंगळूरुने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. माजी विजेत्यांनी निर्धारित २० षटकांत ६ बाद १५१ धावा केल्या. त्यांच्या मदतीला पुन्हा सूर्यकुमार यादव धावून आला. मुंबईच्या डावातील निम्म्या धावा त्याच्या आहेत. सूर्याने सातत्य राखताना ३७ चेंडूंत नाबाद ६८ धावा फटकावल्या. त्यात त्याने ५ चौकार आणि अर्धा डझन षटकारांची आतषबाजी केली. सूर्यकुमारचे यंदाच्या हंगामातील हे सलग दुसरे अर्धशतक आहे. सूर्यकुमारने वैयक्तिक कामगिरीत सातत्य राखतानाच सातव्या विकेटसाठी जयदेव उनाडकटसह सहाव्या विकेटसाठी ४१ चेंडूंत ७२ धावांची नाबाद भागीदारी करताना मुंबईला दीडशेपार नेण्यात मोलाचा वाटा उचलला. मुंबईचा सूर्य तळपण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनने ३८ चेंडूंत ५० धावांची झटपट सलामी दिली. दोघांनी अनुक्रमे २६ धावा केल्या.

त्यात ईशानच्या खेळीत ३ चौकार तसेच रोहितच्या खेळीत ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मात्र, दमदार सुरुवातीनंतर वनडाऊन डीवॉल्ड ब्रेविस (८) लवकर माघारी आला. मधल्या फळीतील तिलक वर्मा आणि कीरॉन पोलार्ड खाते उघडू न शकल्याने १४व्या षटकात मुंबईची अवस्था ६ बाद ७९ धावा अशी झाली. मात्र, सूर्यकुमारमुळे संघाला दीडशेपार पोहोचता आले. बंगळूरुकडून वहिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबईला हरवतानाच बंगळूरुने सलग तिसऱ्या विजयासह ६ गुणांनिशी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. दुसरीकडे, पराभवाच्या चौकाराची नामुष्की ओढवलेला मुंबई संघ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. यंदाच्या हंगामात चार सामन्यांनंतर मुंबईसह गतविजेता चेन्नई सुपरकिंग्जना गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -