ना. नारायण राणे, केंद्रीय उद्योगमंत्री, सूक्ष्म, लघू व मध्यम मंत्रालय यांच्या वाढदिवसानिमित्त…
नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील जबर महत्त्वाकांक्षी आणि वादळी नेतृत्व आहे. गेली पाच दशके राज्यातील सार्वजनिक जीवनात ते सर्वसामान्य लोकांमध्ये दादा म्हणून ओळखले जातात. मुंबईतील चेंबूरमध्ये एका शिवसैनिकापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांचा झालेला राजकीय प्रवास विलक्षण अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. शिवसेना शाखाप्रमुखापासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी केलेली घोडदौड म्हणजे मोठा पराक्रमच आहे. सर्वसामान्यांचा आधार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा आहे. कोकणच्या भूमीवर त्यांचे विलक्षण प्रेम आहे. कोकणचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास आहे. कार्यकर्त्यांची फौज आणि सामान्यांचे प्रेम ही त्यांची पुंजी आहे. वरून कठोर वाटणारा हा माणूस मनातून फणसासारखा आहे, त्यांच्याजवळ गेल्यावर ते पालकांच्या किंवा दादांच्या भूमिकेत कसे असतात हे समजून येते, हेच त्यांचे वेगळेपण आहे.
श्रीमंतीचा गर्व नाही, पैशाचा माज नाही आणि सत्तेच्या परिघात असूनही त्याचा किंचितही अहंकार नसलेला हा नेता आहे. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना सदैव साथ देणारे नेतृत्व आहे. ज्यांनी विश्वासघात केला त्यांच्यावर जाहीरपणे तोफा डागणारा त्यांचा स्वभाव आहे. आपणहून कोणाच्या वाट्याला जाणार नाही, पण कोणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश व आमदार नितेश हे दोघे राजकारणात सक्रिय आहेत. वडिलांच्या कामांचा वारसा लाभलेला असला तरी त्यांनी स्वकर्तृत्वावर आपले करिअर घडवले आहे. नारायण राणे यांना काही राजकीय वारसा नव्हता. वडील गिरणी कामगार, मुंबईत मामाच्या घरी एका खोलीत व व्हरांड्यात राहून दिवस काढणारा मुलगा जिद्द आणि कार्यक्षमतेच्या बळावर राज्याचा मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होतो, हा प्रवास थक्क करणारा आहे. तरुण वयापासून त्यांना शिवसेनेचे आकर्षण. शाखाप्रमुख, शिवसेना नेता, नगरसेवक, बेस्ट कमिटीचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री ही खरंच हनुमान झेप आहे. पदावर काम करताना करतो, बघतो, परत या अशी भाषा त्यांनी कधी केली नाही. एक घाव दोन तुकडे हा त्यांचा स्वभाव. मुख्यमंत्री लोकाभिमुख कसा असावा आणि विरोधी पक्षनेता आक्रमक कसा असावा, हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. ते स्वत: कधी शांत बसत नाहीत आणि इतरांना कधी शांत बसू देणार नाहीत. वाचन आणि माहिती घेणे यात त्यांना नेहमीच रस असतो. त्यांच्याकडे माहिती नेहमीच अद्ययावत असते. मुंबईतील जुहूचे निवासस्थान, दिल्लीतील अकबर रोडवरील निवासस्थान, कणकवलीतील निवास ओम गणेश किंवा नवी दिल्लीतील उद्योग भवनमधील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे कार्यालय येथे सदैव गर्दी दिसून येते. येणाऱ्या माणसाचे काम झाले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असतो.
केंद्र सरकारमधील मराठी मंत्री हा महाराष्ट्राचा दिल्लीतील अॅम्बॅसेडर असतो. राज्य आणि केंद्र सरकारमधील तो दुवा असतो. पण राज्यातील महाआघाडी सरकारला त्याचे भान नसावे. शरद पवार किंवा एखादा नेता सोडला, तर महाआघाडीचे कोणीही दिल्लीशी संबंध ठेवत नाहीत. तेव्हा आपल्या राज्याचे केंद्रात मंत्री जे आहेत त्यांच्याशी राज्याने नियमित संवाद ठेवला पाहिजे. पण तसे न करता त्यांच्यावर कारवाई करणे, गुन्हे दाखल करणे, पोलीस ठाण्यावर चौकशीसाठी बोलावणे, कोर्टात उभे करणे असले सुडाचे राजकारण करण्यातच आघाडी सरकार गुंतले आहे. राणे यांचे काम, कर्तृत्व मोठे आहे, याची दखल घेऊनच त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कणकवलीला लाइफ टाइम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी जाहीरच करून टाकले. ठाकरे सरकारला फाडून खाणारा, थेट मातोश्रीला आवाज देणारा हा शक्तिमान टायगर आहे, हे अमित शहांनी ओळखले आहे. मोदी-शहांनी दिलेला शब्द पाळला व नारायण राणे केंद्रात मंत्री झाले. राणे केंद्रात मंत्री झाले आणि त्या दिवसापासून ठाकरे सरकारला पोटदुखी सुरू झाली. राणेंचा काटा कसा काढायचा यासाठी पोलीस व प्रशासनाचे सारे सीसीटीव्ही त्यांच्यावर रोखले गेले.
गेल्या वर्षी कोकणात अतिवृष्टी झाल्यावर व पुराने गावेच्या गावे पाण्याखाली गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणे यांना थेट कोकणात जाऊन पाहणी करण्यास सांगितले. राणे महाड, चिपळूणला पोहोचले. पण तेथे वरिष्ठ जबाबदार अधिकारी हजर राहणार नाहीत, अशी जणू सरकारने व्यवस्थाच केली असावी. पण राणेंना पाहताच पूरग्रस्त जनतेच्या अश्रूंचा बांध फुटला. ‘‘दादा, तुम्हीच आमचे वाली आहात, तुम्हीच आम्हाला वाचवा, मदत करा’’, असा टाहो लोकांनी फोडला. राणे तेथे पोहोचेपर्यंत सरकार ढिम्म होते. भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आलेल्या राणेंनी थेट शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली, याने शिवसेनेचे पित्त खवळले.
राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला भर पावसात मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघून महाआघाडीत बोटे मोडली गेली. ‘ज्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव की अमृत महोत्सव ठाऊक नाही, त्याला मी तिथे असतो तर कानशिलात…’ …असे उद्गार काढल्याने त्यांच्यामागे चोहोबाजूंनी पोलिसांचा फौज-फाटा सरकारने लावला. दोन दिवस राणे यांच्यावरील पोलीस कारवाईचे सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण चालू होते. काहीही करून राणे यांना उचला म्हणून पालकमंत्री कसे पोलिसांना आदेश देत होते, हे सर्व जनतेने टीव्हीच्या पडद्यावरून बघितले. ठाकरे सरकार राणेंच्या विरोधात कसे सुडाने पेटले आहे, याचे ते गलिच्छ उदाहरण होते. ज्या दिवशी राणे केंद्रात मंत्री झाले तेव्हाच महाआघाडीला घाम फुटला. राणे गप्प बसणार नाहीत, ते सरकारची चिरफाड करणार याची आघाडीतील तीनही पक्षांना पूर्ण जाणीव झाली. दिशा सॅलियनच्या गूढ मृत्यूप्रकरणी नारायण राणे व नितेश राणे यांनी वेळोवेळी आवाज उठवला, त्यांनी जो संशय व्यक्त केलाय त्याची सखोल चौकशी करू, असे सांगण्याचे धाडस या सरकारमध्ये होत नाही. उलट दिशाच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर राणे यांना पोलीस ठाण्यावर कसे तत्परतेने बोलावले जाईल, यावर सरकारचा कटाक्ष दिसला. राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश निवासस्थानावर कारवाई करण्याची महापालिकेला घाई झालेली दिसली. पण न्यायालयाने विचारणा करताच महापालिकेने घुमजाव कसे केले हे सर्व जनतेने अनुभवले. राणे यांच्या घरासमोर युवासेनेच्या बॅनरखाली काहींनी हुल्लडबाजी केली, त्यांच्यावर काय कारवाई झाली? यावर सरकार मूग गिळून बसले आहे.
कोकणात सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळ व्हावा, यासाठी राणेंनी अविश्रांत परिश्रम घेतले. कोकणाच्या विकासाला गती प्राप्त करण्यासाठी चिपी विमानतळ किती महत्त्वाचा आहे, हे सतत पटवून देत होते. चिपीच्या उद्घाटनाच्या दिवशी जे मिरवत होते, तेच चिपीच्या भूमिपूजनाच्या वेळी विरोध करण्यासाठी निदर्शने करीत होते, त्याची त्यावेळची प्रसिद्ध झालेली कात्रणे राणेंनी मंचावरून फडकावली, तेव्हा त्यांची तोंडे बघण्यासारखी झाली होती. राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून शिवसेनेपुढे आव्हान उभे केले आहेच, पण केंद्रात मंत्री झाल्यापासून ठाकरे सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. आपण चुकीचे करीत नाही, मग कशासाठी गप्प बसायचे ही त्यांची कार्यपद्धती आहे. राजकारण आणि विकास यांची गल्लत होता कामा नये, यावर त्यांचा कटाक्ष असतो. म्हणूनच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत कोकणात, राज्यात व देशात जास्तीत-जास्त गुंतवणूक, रोजगार आणि उत्पादन कसे होईल यावर त्यांचा भर आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या खात्यासाठी सहा हजार कोटींची भरीव तरतूद केली आहे. एमएसएमई क्षेत्रातील रोजगारनिर्मिती अकरा कोटींवरून पंधरा कोटी निर्माण करण्याचे त्यांनी लक्ष्य ठरवले आहे.
नारायण राणे यांनी ३९ वर्षे शिवसेनेत काढली, पण उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होताच राणे यांचा मातोश्रीला अडसर वाटू लागला. राणे यांनी ९ वर्षे काँग्रेसमध्ये काढली. पण सहा महिन्यांत मुख्यमंत्रीपद देऊ, असे प्रवेशापूर्वी दिलेले आश्वासन काँग्रेसने कधीच पूर्ण केले नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही आपल्याला नवा स्पर्धक नको, या विचाराने ग्रासले होते. भाजपमध्ये मोदी-शहा यांनी नारायण राणे यांना सन्मान दिला. मार्च २०१८ मध्ये राज्यसभेत खासदार केले. गेल्या वर्षी केंद्रात मंत्रीपद दिले. पक्ष संघटना आणि उद्योग मंत्रालय दोन्ही आघाड्यांवर राणेसाहेब मनापासून जिद्दीने काम करीत आहेत. एकदा निर्णय झाला की, तो बदलत नाहीत, एकदा निश्चय केला की, मग मागे फिरत नाहीत आणि एकदा शब्द दिला की, तो कधी मोडत नाहीत, असा दादांचा स्वभाव आहे. दि. १० एप्रिल हा दादांचा वाढदिवस. त्यांच्या मनोकामना व सारे संकल्प पूर्ण होवोत आणि जनसेवेसाठी आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो या त्यांना दै. प्रहार परिवारातर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा!…
सुकृत खांडेकर [email protected]