Monday, July 15, 2024
Homeक्रीडाचेन्नईचा पराभवाचा ‘चौकार’

चेन्नईचा पराभवाचा ‘चौकार’

गतविजेत्यांना हरवून हैदराबादने उघडले गुणांचे खाते

मुंबई (प्रतिनिधी) : गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा पाय खोलातच आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या संघाला सनरायझर्स हैदराबादकडून ८ विकेट आणि १४ चेंडू राखून मात खावी लागली. त्यांचा यंदाच्या आयपीएल हंगामातील हा सलग चौथा पराभव आहे. आजवरच्या हंगामात सलग चार वेळा हरणारा चेन्नई पहिला चॅम्पियन्स संघ ठरला.

चेन्नईने मोईन अलीच्या ४८ धावांच्या खेळीच्या बळावर २० षटकात १५४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिभावंत अभिषेक शर्माने ७५ धावांची दमदार खेळी केली. त्याच्यासह राहुल त्रिपाठीच्या नाबाद ३९ धावांच्या जोरावर हैदराबाद संघाला १८व्या षटकात विजय मिळवून दिला. या विजयासह सनरायझर्सनी आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुणांचे खाते उघडले. सलामीवीर अभिषेक शर्माने ५० चेंडूत ७५ धावा करत त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.

त्यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. अभिषेकने केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही, तर कर्णधार केन विल्यमसनसह ८९ धावांची शानदार सलामी देत विजयाची पायाभरणी केली. विल्यमसन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने फटकेबाजी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. त्याने १५ चेंडूंत नाबाद ३९ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला २० षटकांत ७ बाद १५४ धावा करता आल्या. आघाडीच्या फळीतील प्रमुख फलंदाजांनी निराशा केली तरी अष्टपैलू मोईन अलीने एक बाजू लावून धरताना ३५ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. त्याच्यासह अंबाती रायुडू (२७ चेंडूंत २७ धावा) आणि कर्णधार रवींद्र जडेजामुळे (१५ चेंडूंत २३ धावा) सुपरकिंग्जला दीडशेपार मजल मारता आली. चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली तरी रॉबिन उथप्पा (१५) ऋतुराज गायकवाड (१६) लवकर बाद झाले. हैदराबादकडून टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -