मला आठवतंय, त्या दिवशी राणेसाहेबांच्या राजकीय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची घटना घडत होती. ६ जुलै २०२१ रोजी आदरणीय ‘दादा’ केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार होते. दादांच्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मलाही निमंत्रित करण्यात आले होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व बंधने पाळून होत असलेल्या या समारंभास कुटुंबातील मोजकीच मंडळी अपेक्षित होती. त्यातही श्री. दादांनी मला दिलेल्या निमंत्रणामुळे मी व माझे सर्व कुटुंबिय भारावून गेलो होतो. सायंकाळी ६ वा. होणाऱ्या समारंभासाठी मी दिल्ली येथे दुपारी ३ वाजेपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते; परंतु त्याच वेळी माझी पत्नी सौ. लिना हिच्या पाठदुखीने उचल खाल्ली. तातडीने तिला उपचारासाठी मुंबई येथे न्यावे लागले. दुपारी ३ वाजता एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काही महत्त्वाच्या तपासण्या करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. त्याच वेळी सौ. राणे वहिनींचा फोन आला, “तुम्ही किती वाजेपर्यंत पोहोचताय?” या त्यांच्या प्रश्नावर त्यांना काय उत्तर द्यावे ते कळेना. राणे कुटुंबीयांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या व तेवढ्याच आनंददायी प्रसंगी आपली अडचण त्यांना सांगावी की सांगू नये? या द्विधा मन:स्थितीत असतानाच त्यांचा दुसरा प्रश्न कानावर धडकला, ‘तुम्ही कोठे आहात?’ मग मात्र मला राहवले नाही, मी हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगत त्यांना सर्व परिस्थिती सांगितली व दिल्लीला येऊ शकत नसल्याचे सांगितले. सौ. वहिनींनी मला धीर दिला व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
वहिनींच्या पाठोपाठ दादांचा फोन आला. त्यांनी त्या गडबडीतही माझ्या पत्नीच्या तब्येतीबद्दल सर्व जाणून घेतले व लगोलग त्यांनी त्या हॉस्पिटलच्या प्रमुखांशी संवाद साधल्याचा प्रत्यय आम्हाला आला. हॉस्पिटलची यंत्रणा झटपट हालताना दिसू लागली. प्रत्येकजण अत्यंत अदबीने व काळजीपूर्वक वागताना दिसू लागला. त्या हॉस्पिटलच्या समोरच माझे व दादांचे फॅमिली डॉक्टर फुलारा यांचे क्लिनिक आहे. थोड्याच वेळात त्यांचाही फोन आला, त्यांनी सांगितले की, ‘आताच त्यांना श्री. राणे साहेबांचा फोन आला होता व त्यांनी माझ्या पत्नीच्या चाचण्यांचे सर्व रिपोर्ट्स पाहून दादांना ताबडतोब कळविण्यास सांगितले आहे. वास्तविक डॉ. फुलारा यांना दुसरीकडे जायचे होते; परंतु पत्नीच्या सर्व चाचण्या होईपर्यंत ते क्लिनिकमध्ये थांबणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. चाचण्या करणाऱ्या डॉक्टर्स व तंत्रज्ञांशीही त्यांनी चर्चा केली होती. चाचण्या झाल्यानंतर आम्ही डॉक्टर फुलारांकडे गेलो. त्यापूर्वीच त्यांनी हॉस्पिटलकडून सर्व माहिती घेऊनदादांना कळविली होती. शपथविधीला केवळ अर्धा तास असताना या सर्व गोष्टी घडत होत्या. डॉ. फुलारांनाही या गोष्टींचे नवल वाटत होते. शपथविधीच्या गडबडीतही चौकशीसाठी दादांचा दोन वेळा फोन आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले व दादांच्या व त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा देत दादांच्या निर्मळ मैत्रीची अनेक उदाहरणे दिली. हे ऐकत असताना एवढ्या मोठ्या व्यक्तीने आम्हाला दिलेल्या कौटुंबिक मित्राच्या दर्जाने आम्ही भारावून गेलो होतो. कळत-नकळत दोघेही भावनिक झालो होतो.
ज्ञानदेवांनी पसायदानात जशी प्रार्थना केली आहे की, ‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे’, भगवान बुद्धांनी मैत्री, मुदिता व करुणा या भावनांना आवाहन केले आहे. मैत्री ही एक सद्भावना आहे. तो एक दृढ भावबंध आहे, ही एक मनाची भूक आहे, या संताच्या विचारांचा अनुभव मला दादांच्या मैत्रीत आला. माझी आई मला नेहमी म्हणायची, ‘संकटकाळी मदतीला येतो, तोच खरा मित्र ही संकल्पनाच चुकीची आहे. ज्याची मदत करण्याची क्षमता आहे तो एक वेळ मदत करेलही; परंतु आपल्या मित्राची प्रगती होत असताना ज्याला आनंद होतो, तोच खरा मित्र.’ दादांच्या बाबतीत माझ्या आईचे हे निरीक्षण तंतोतंत लागू होते. मित्राची प्रगती पाहून दादांना नेहमीच मनस्वी आनंद होतो. ते त्याची संपूर्ण माहिती घेतात व पुढील दिशा कशी असावी, याबाबत प्रामाणिक सल्लाही देतात.
लोकप्रतिनिधींना ‘नोटाबंदी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथे भरणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यात उद्धवजींनी मला आमंत्रित केले होते. खासदार अनिल देसाई हे त्याचे नियोजन करत होते; परंतु व्याख्यानाच्या आदल्या दिवशी निर्माण झालेल्या घरगुती अडचणींमुळे मी जाऊ शकलो नाही. ही गोष्ट ज्यावेळी राणे साहेबांना समजली, त्यावेळी त्यांनी मला विचारले की, ‘तुम्ही शिवसेनेच्या सभेत व्याख्यानासाठी गेलात, तर मला काय वाटेल या विचारांनी जर तुम्ही गेला नसाल, तर ती तुमची चूक आहे. त्यांनी तुमच्या ज्ञानाला बोलाविले आहे. तुमचे ज्ञान इतरांना देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही व्याख्यानाला गेला असता, तर मला जास्त आनंद झाला असता.’ खरोखरच काय ही मैत्रीची प्रगल्भता! खऱ्या मैत्री कसलेच गणित नसते, कसलाच जमाखर्च नसतो, असते ती फक्त लाभाविना केली जाणारी प्रिती. अशी मैत्री ही एक प्रकारची भावभक्तीच असते.
आर्थिक व सहकार क्षेत्रांत मी गेली ३० वर्षे सामाजिक जाणिवेतून कार्यरत असल्याने व सध्या माझ्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक मोठ्या व्यक्तींना भेटण्याचे व त्यांच्याशी चर्चा करण्याचे भाग्य मला मिळते, दादांना या सर्व गोष्टीचे कौतुक वाटते. या सर्व दिग्गजांशी असलेला माझा स्नेह, आमच्या मैत्रीमध्ये कधीच अडथळा ठरला नाही, हा या दिग्गजांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल. एकदा राणे साहेबांच्या ‘झंझावात’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास आदरणीय ज्येष्ठ नेते पवार साहेब, नितीनजी गडकरी व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मलाही स्टेजवर बसवून दादांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला सन्मानित केले होते.
कार्यक्रमामध्ये मी माझे मनोगत व्यक्त केले. ते ऐकून कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पवार साहेबांनी मला विचारले, ‘अनास्कर तुम्ही कोकणातले का?’ मी नाही असे सांगितल्यावर त्यांनी विचारले. मग तुमची व राणेंची एवढी मैत्री कशी? खरोखरच त्या प्रश्नाचे उत्तर मी कधीच देऊ शकणार नाही. मैत्री ही तशी निरक्षेप असते, योगायोगाने ती जमते. भविष्यात आपली कामे करवून घेण्यासाठी वाढविली जाते ती ओळख, मैत्री नव्हे. मिळते-जुळते स्वभाव मैत्रीला पोषक ठरतात. खरी मैत्री ही उघड, पारदर्शक असते, ती मिरवावी लागत नाही किंवा लपवावीदेखील लागत नाही, मैत्री सदैव समानतेच्या पातळीवर नांदते, तिला विषमतेचे वावडे असते. कृष्ण व सुदामा यांच्यात मैत्री होऊ शकते, लाचारी नसते तेथेच मैत्री वावरते.
दादांच्या मैत्रीमध्ये वर नमूद केलेले भाव व रंग मी अनुभवले आहेत. खरंच! दादांबरोबर असलेली माझी मैत्री मला कधीही लपवावी लागली नाही. अथवा, ती कधी मिरवावीशी देखील वाटली नाही. एवढ्या मोठ्या दादांनीही आमची मैत्री नेहमीच समानतेच्या पातळीवर नांदविली. मी स्वत: राजकारणापासून अलिप्त असल्याने वारंवार आमच्या भेटीही होत नाहीत; परंतु दादा ज्यावेळी पुण्यामध्ये येतात तेव्हा त्यांच्या व वहिनींबरोबर जमणारी गप्पांची मैफल आंतरिक अद्वैताचा अनुभव देऊन जाते. संतांनी म्हटल्याप्रमाणे मैत्री म्हणजे भावभावनांची समरसता व व्यक्तिमत्त्वांची समरूपता, हे खरेच आहे. अशा या निर्मळ मैत्रीचे बंध जपणाऱ्या राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा !
-विद्याधर अनास्कर – प्रशासक, राज्य सहकारी बँक अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन