Tuesday, January 21, 2025
Homeराजकीयकर्तृत्ववान नेतृत्व.... राणे साहेब!

कर्तृत्ववान नेतृत्व…. राणे साहेब!

एक मार्गदर्शक नेता म्हणून मी आजपर्यंत राणे साहेबांकडे पाहत आलो आहे. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांनी सरकारपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवला. यापुढेही मला आणि महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत राहो, त्यांच्या हातून देशाची सेवा अशीच यापुढेही घडत राहो.

प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

जय-पराजय तितक्याच ताकदीने पचवणाऱ्या, राजकीय हल्ल्यांना तेव्हढ्याच प्रखरपणे प्रत्युत्तर देणाऱ्या, राजकीय हिशेब न मांडता जनहितार्थ सडेतोड विचार मांडणाऱ्या, कोकणच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या विकासाची सतत चिंता करणाऱ्या आणि वरवर कठोर पण आतून फणसाच्या गऱ्यासारखे मऊसूत आणि प्रेमळ असणाऱ्या माजी मुख्यमंत्री, भाजप नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री, आदरणीय श्री. नारायण राणे साहेबांचा वाढदिवस  कोकणापासून संपूर्ण महाराष्ट्र आज साजरा करतोय, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विशेष आनंद आहे.

मा. श्री. नारायण राणे यांनी नगरसेवक, विधानसभा आणि विधान परिषद सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि आता केंद्रीय मंत्री यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण आहेच, पण त्याबरोबरच प्रशासनाला मदतीला घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा जवळजवळ ५०-५५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभवदेखील त्यांच्या गाठीशी आहे. आज मी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद  सांभाळत असल्यामुळे या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची मला चांगली जाण आहे. राणे साहेबांनीदेखील विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी यापूर्वी अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे. साहेबांचे विरोधी पक्षनेता म्हणून अर्थसंकल्पावरील भाषण असो, नाही तर इतर विषयांवरील भाषणे, सरकारला घाम फोडणारी होती. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांनी विधिमंडळाच्या वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा चपखल वापर करून जनसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला. त्या काळात साहेबांचे सभागृहात भाषण सुरू होण्यापूर्वी अधिकारी आणि पत्रकार गॅलरी पूर्ण भरलेली असायची. त्यांची विधिमंडळातील भाषणे मुळातून वाचण्यासारखी आहेत. ती नुसती चाळली तरी लक्षात येते की, जनतेच्या असंख्य प्रश्नांना त्यांनी सभागृहात वाचा फोडली. मुद्देसूद मांडणी, अचूक आकडेवारी, प्रश्नाचे गांभीर्य पटवून देण्याचे कौशल्य, सरकारचा निष्काळजीपणा आणि प्रशासनिक चुकांवर ठेवलेलं नेमकं बोट आणि त्याबरोबरच तो प्रश्न सोडवण्यासाठीची विधायक सूचना, अशा परिपूर्ण आणि अभ्यासू वक्तृत्वाची प्रचिती त्यांच्या भाषणातून मिळते.

श्री. राणे साहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवले. स्पष्टवक्तेपणामुळे साहजिकच इतरांपेक्षा राणे साहेबांना राजकीय शत्रू अधिक. पण तरीही त्यांनी कधी आपल्या लढाऊ वृत्तीशी तडजोड केली नाही. यामुळेच राणे साहेबांचा आजही महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा कायम आहे. राजकारणात कितीही चढउतार आले तरी लोकोपयोगी कामांकडे त्यांचे कधी दुर्लक्ष झाले नाही. त्यामुळेच पदावर नसतानाही त्यांचा “जनता दरबार” नेहमी भरलेलाच राहिला.

आज मा. श्री. नारायण राणे साहेब केंद्रीय लघू उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. ज्या-ज्या वेळी त्यांची भेट होते, त्या प्रत्येक वेळी ते एकच सांगत असतात, महाराष्ट्रातील युवा पिढीला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करा, लघू उद्योग मंत्रालयाशी संबंधित काही मदत लागली, तर माझ्याकडे घेऊन या. जात, पात, धर्म, पंथ, पक्ष न बघता आपण त्यांना मदत करायची आहे. महाराष्ट्रासाठीची ही तळमळ आजही त्यांच्यात धगधगते आहे.

श्री. राणे साहेबांचा कार्यकर्त्यांचा गोतावळा खूप मोठा आहे. जनसंपर्क दांडगा आहे. ते माणसात राहणारे नेते आहेत आणि म्हणूनच राणे साहेबांना एक चिरपरिचित, आपला नेता म्हणून पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ही ओळख त्यांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केली आहे. आजपर्यंत राणे साहेबांवर अनेक संकटे आली, अनेकवेळा त्यांना अडचणीत आणण्याचाही प्रयत्न झाला. पण हा कोकणचा सुपुत्र सर्वांना पुरून उरला, याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.

एक मार्गदर्शक नेता म्हणून मी आजपर्यंत राणे साहेबांकडे पाहत आलो आहे. यापुढेही मला आणि महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत राहो, त्यांच्या हातून महाराष्ट्राची आणि देशाची सेवा अशीच यापुढेही घडत राहो. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायू मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. नारायण राणे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -