सुमारे दोन हजार वर्षांपासून कॅलक्युलेटरप्रमाणे वापरत असलेले मॅथेमॅटिक्स टूल म्हणजे ‘अबॅकस’. बहुतेकांना वाटतं की, ‘अबॅकस’ फक्त लहान मुलांना शिकवतात. मात्र हा समज शुभदा भावे यांनी खोटा ठरवला आहे. ‘किड्स इंटेलिजन्स’ या संस्थेमार्फत शुभदा भावे फक्त मुलांनाच नाही, तर कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधरास अबॅकस टीचर बनण्याचे प्रशिक्षण वर्ग घेतात. शुभदा भावेमुळे अनेक स्त्री- पुरुष टीचर्स ट्रेनिंग घेऊन स्वत:चा व्यवसाय करत आहेत.
कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत मोठा प्रसंग असतो तो म्हणजे आई होण्याचा. शुभदा भावेंच्या आयुष्यातील हा प्रसंग कठीण होता. त्यांच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत झाली. मात्र शेवटी एका गोंडस कन्येला त्यांनी जन्म दिला. त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या वेळीसुद्धा असाच संघर्ष त्यांना करावा लागला. मात्र आज त्या बाळाने चांगलंच बाळसं धरलंय. हे बाळ म्हणजे शुभदा भावेंची किड्स इंटेलिजन्स ही कंपनी. शुभदा भावेंची ‘किड्स इंटेलिजन्स’ आज शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने वाढणारी संस्था आहे. मात्र याची सुरुवात एका वेगळ्या महत्त्वाकांक्षेतून झाली. शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चा ब्रॅण्ड तयार करणाऱ्या शुभदा लहानपणी मात्र शाळेत यथातथाच होती. चौथीपर्यंत तिचं शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. तिचे बाबा अशोक धनू हे आयटीआयचे शिक्षक होते, तर आई मनीषा धनू गृहिणी. आजी अचानक गेल्याचा धसका शुभदाने घेतला. तिचं जणू भावविश्वच बदललं.
टॉमबॉयसारखी वागणारी शुभदा अचानक अंतर्मुख झाली. मॅच्युअर्ड झाल्यासारखी वागायला आली. धनू कुटुंबीय डहाणूवरून माहीमला आलं. माहीमच्या सरस्वती विद्यालयात तिचं नाव घातलं गेलं. आपण खूप अभ्यास केला पाहिजे, हे मनाशी ठरवून ती अभ्यासाला लागली. दहावीनंतर तिने अकरावीसाठी लोकमान्य विद्यामंदिरात प्रवेश घेतला. शुभदाचा ओढा हा मानसशास्त्राकडे होता. मनाच्या अभ्यासाचं तिला नेहमी गूढ वाटायचं. मात्र तिच्या बाबांना वाटायचं की, तिने संगणक अभियंता व्हावं. तसा तो काळदेखील संगणकाचाच होता. शुभदाने मुंबई सेंट्रलच्या बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तीन वर्षांची पदविका मिळवली. त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी. पूर्ण केलं. पुढे एम.एस्सी. करण्य़ाचा विचार केला. शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी तिने एका खासगी बँकेत एक वर्षे नोकरी केली. मात्र या नोकरीत तिला स्वारस्य वाटले नाही. तिने काही महाविद्यालयांत सी प्रोग्रामिंग देखील शिकवलं; मात्र तिथे पण तिचं मन रमलं नाही. याच कालावधीत तिने रेकी, प्रणीक हिलिंग, न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्राम आदी विषयांचं ज्ञान घेतलं.
‘अबॅकस’ हा विषय देखील याचदरम्यान तिच्या अभ्यासात आला. गणित म्हटलं की, लहान मुलांच्या अंगावर काटा येतो पण हे गणित खेळीमेळीच्या वातावरणात शिकवलं, तर मुलांची गणितासोबत गट्टी जमेल. हेच ध्यानात घेऊन शुभदाने रविवारी ‘अबॅकस’चे वर्ग घेण्यास सुरुवात केली. आईने दिलेले ७ हजार रुपये आणि स्वत:चे ३८ हजार रुपये असे ४५ हजार रुपयांचे भांडवल उभारत शुभदाने ‘अबॅकस’ वर्ग सुरू केले. हीच खऱ्या अर्थाने किड्स इंटेलिजन्सची सुरुवात. सरस्वती महाविद्यालयात आणि शिवाजी मंदिरात ती मुलांचे अबॅकसचे वर्ग घेऊ लागली. ४-५ मुलांनिशी सुरू झालेला वर्ग अवघ्या दीड वर्षांत ७०च्या पटात पोहोचला. खरं तर अरबी गणक प्रणाली अस्तित्वात येण्यापूर्वी अबॅकस प्रणाली युरोप, चीन, रशियामध्ये प्रचलित होती. ती एक मोजण्याची गणकप्रणाली होती. याच्या सहाय्याने मुले गणितात चमकदार कामगिरी करू शकतात, असा दावा शुभदा भावे करतात.
सुरुवातीच्या त्या ४-५ मुलांना शिकवताना शुभदाला जाणवले की, या मुलांच्या पालकांना देखील प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी पालकत्त्वाच्या कार्यशाळा घेतल्या. पालकांचे समुपदेशन केले. त्यामुळे त्या ४-५ मुलांवरून ही संख्या ७०च्या घरात पोहोचली. या मुलांना शिकवण्यासाठी इतर शिक्षकदेखील येत. मात्र पालकांनी शुभदाला सांगितले की, तिच्याइतकं प्रभावी इतर शिक्षक शिकवत नाही. याचवेळेस शुभदाने आपल्यासारखे शिक्षक घडविण्याचा मानस मनाशी पक्का केला. यातूनच शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू झाले. पहिलं प्रशिक्षण तिने आपल्या लहान बहिणीला सुदैवी धनू हिला दिले. त्यानंतर पुणे, चेन्नई, बंगलोर सह जगातील १३ देशांत ‘किड्स इंटेलिजन्स’ पोहोचली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, दुबई, सौदी अरेबिया, कॅनडा, सिंगापूर, स्कॉटलॅंड आदी देशांचा समावेश आहे.
दरम्यान यशोधन भावे या तरुणासोबत शुभदाचा विवाह झाला. विवाहानंतर ती अंधेरीला राहायला आली. शुभदाला तिच्या सासूने रेखा भावे यांनी उद्योग करण्यासाठी भरभक्कम पाठिंबा दिला. २०१३ साली दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. शुभदाचा फार मोठा आधार गेला. २०१६ साली अजून एक मोठी घटना शुभदाच्या आयुष्यात घडली. तिच्या प्रसूतीदरम्यान गुंतागुंतीची समस्या निर्माण झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र यामुळे तिने आपल्या तब्बेतीकडे आणि मुलीकडे लक्ष द्यावे, त्यांच्या आरोग्यास प्राधान्य देण्यात आलं. शुभदालादेखील ते उमगले. तिने काही काळ आपल्या कामाच्या व्यापातून विश्रांती घेतली.
बालसंगोपनासाठी व्यवसाय सोडलेली स्त्री परत व्यवसायाकडे वळणं कठीणच. मात्र शुभदाचे पती यशोधन, आई मनीषा यांनी शुभदास सक्रिय पाठिंबा दिला. घरातच तिने प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात केली. कोरोनाकाळात हे सारं ऑनलाइन प्रणालीकडे झुकलं. शुभदाने देखील ऑनलाइन वर्ग घेतले. शुभदामुळे अनेक स्त्री-पुरुष टीचर्स ट्रेनिंग घेऊन स्वत:चा व्यवसाय करत आहेत. आपण जे काम करू त्याला वाव कसा मिळेल, याची वाट पाहत बसण्यापेक्षा अशी परिस्थिती निर्माण करा की, जेणेकरून तुमच्या कामाला वाव मिळेल. व्यवसायात स्वत:ला सतत अपग्रेड ठेवता आलं पाहिजे. चिकाटी आणि निरंतर संशोधन करता आलं पाहिजे. कोणताही व्यवसाय हा माणसांवर अवलंबून असतो. त्यामुळे आपल्यासोबतच्या चांगल्या सहकाऱ्यांना जपता आलं पाहिजे. तरच व्यवसाय वाढेल. असा व्यवसायाचा कानमंत्र ही ‘लेडी बॉस’ देते.
अर्चना सोंडे [email protected]